वांगे, कोबी, टमाटे अन् उसात लावली गांजाची झाडे; ८ एकरात अनेकदा पिक घेतल्याचे उघड
By राम शिनगारे | Published: November 3, 2022 03:56 PM2022-11-03T15:56:55+5:302022-11-03T15:57:36+5:30
८२ किलो वजनाची गांजाची ५६ झाडे जप्त करण्यात आली असून दोघे अटकेत
औरंगाबाद : आठ एकरमध्ये असलेल्या वांगे, काेबी, टमाटे आणि उसाच्या शेतात गांजाची झाडे लावण्यात आल्याचा प्रकार वेरुळ परिसरातील तलाववाडी शिवारात उघडकीस आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत तब्बल ८ लाख २४ हजार ५४० रुपये किंमतीची ८२ किलो ४ ग्रॅम वजनाची ५६ झाडे जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धनसिंग गुंडीराम गुमलाडू आणि झनकसिंग गुंडीराम गुमलाडू (रा. वेरुळ, ता. खुलताबाद) या दोघांना अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक प्रदीप पोटे, भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांना तलाववाडी शिवारातील गुमलाडू बंधुच्या गट नंबर ११२ मध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवारी सायंकाळी छापा मारला. धनसिंगच्या शेतात गांजाची १८, झनकसिंगच्या शेतात ३८ झाडे सापडली. एकुण ५६ झाडांचे वजन ८२ किलो एवढे भरले आहे. ही झाडे वांगे, कोबी, टमाटे, कापुस आणि उसाच्या शेतीत लावण्यात आली होती. या दोन्ही आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. ही कारवाई उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक प्रदीप पोटे, निरीक्षक विजय रोकडे, संजय जाधव, दुय्यम निरीक्षक एस.बी. रोटे, ए.ई. तातळे, भरत दौंड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, एस.एस. गुंजाळे, जवान वाय.बी. गुंजाळ, आर.जे. मुरडकर, अनिल जायभाये, जी.पी. शिंदे, टी.ए. जारवाल, ज्ञानेश्वर सांबारे, कृष्णा पाटील, एस.एम. कादरी व किसन सुंदर्डे यांच्या पथकाने केले.
गांजाचे अनेकदा घेतले पीक
शेतातुन जप्त केलेले गांजाच्या झाडांची खाेडं अतिशय मजबुत आहेत. यापूर्वी खोड कायम ठेवुन वरील गांजाची पाने कापुन घेतले. त्यानंतरही पुन्हा गांजाचे पिक घेतल्याचे झाडावरुन स्पष्ट होत असल्याचे अधीक्षक झगडे यांनी सांगितले.
अंमली पदार्थाची पहिलीच कारवाई
राज्य उत्पादन शुल्कच्या औरंगाबाद विभागाने यापूर्वी अंमली पदर्थ पकडण्याची कारवाई केलेली नाही. ही पहिलीच कारवाई असावी, असे उपायुक्त प्रदीप पवार यांनी सांगितले. तर येत्या काळात अंमली पदर्थांच्या विक्रीविरोधात मोहिमच उघडण्यात येणार असल्याचे अधीक्षक झगडे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.