कावळ्यांनी केले रक्तबंबाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 12:39 AM2016-03-15T00:39:59+5:302016-03-15T00:39:59+5:30
औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे.
औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे. कावळ्यांच्या सततच्या टोचण्यांमुळे येथील जवळपास सर्वच सांबर अक्षरश: रक्तबंबाळ झाली आहेत. गेल्या किती तरी महिन्यांपासून रोज शेकडो कावळे टोचण्या मारून सांबरांना जखमी करीत असताना प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी मात्र, त्याकडे पुरते दुर्लक्ष करीत आहेत.
मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात बिबट्यांच्या तीन बछड्यांचा नुकताच मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी गरोदर रेणूची योग्य काळजी न घेतल्यामुळेच तिची मुदतपूर्व प्रसूती झाली. परिणामी अशक्त जन्मलेली तिन्ही पिल्ले जन्मानंतर ३६ तासांतच दगावली. सध्या वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून त्याची चौकशी सुरू आहे. परंतु केवळ बिबट्यांनाच नव्हे तर इतर प्राण्यांनाही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मगरी आणि बगळ्यांचे हौद रिकामे झाले आहेत. त्यात तळाला अगदीच थोडे पाणी असल्यामुळे या प्राण्यांची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे सांबरांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे. याठिकाणी खूप मोठ्या जागेत जवळपास पन्नासहून अधिक सांबरांना ठेवण्यात आलेले आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुसंख्य सांबर हे कावळ्यांच्या टोचण्यांमुळे जखमी झाले आहेत. शेकडो कावळे दिवसभर अंगावर बसून टोचण्या मारत असल्यामुळे अनेक सांबर रक्तबंबाळ झाले आहेत. परंतु एवढे सर्व होऊनही प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कावळ्यांचा त्रास रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.