'माझ्या पत्नीला शोधू शकत नाहीत तुम्ही काय कामाचे'; संतप्त पतीचा ठाण्यातच पोलिसांवर हल्ला
By राम शिनगारे | Published: August 19, 2022 07:53 PM2022-08-19T19:53:28+5:302022-08-19T19:54:07+5:30
पत्नीने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळूनच घर सोडल्याचे पोलिसांना कळविले होते.
औरंगाबाद : ‘तुम्ही माझ्या बायको आणि मुलाला शोधू शकत नाहीत, तर तुम्ही काय कामाचे?’ असे म्हणत तरुणाने पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्यांवर कटरने वार करून मारहाण केली. हा प्रकार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात घडला. प्रल्हाद किसान भंडारे (२८, रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
प्रल्हाद भंडारे याने आठ दिवसांपूर्वी पत्नीसह दोन मुले हरविल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी हरविलेल्या महिलेचा तपास सुरू केला होता. तिच्याशी संपर्कही साधण्यात आला होता. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळूनच तिने घर सोडल्याचे पोलिसांनाही कळविले होते. मात्र, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रल्हाद भंडारे हा पोलीस ठाण्यात आला. तेव्हा पोलीस शिपाई कैलास चव्हाण हे कर्तव्यावर होते. त्याने चव्हाण यांना माझ्या बायको आणि मुलाला शोधू शकत नाहीत, तर तुम्ही काय कामाचे? असे म्हणून वाद घातला.
पोलीस भंडारेला समजून सांगत असतानाच त्याने कर्मचारी चव्हाण आणि होमगार्ड वाघुले यांच्यावर कटरने हल्ला चढवला. यात दोघेंही जखमी झाले. त्याचवेळी सहायक फाैजदार आघाव यांना कटरचा धाक दाखवून धमकावले. तेव्हा इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी भंडारे यास पकडले. त्यानंतर निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या आदेशाने त्याच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळ्यासह मारहाणीचा गुन्हा नोंदवला. आरोपीला अटक करुन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन मिरधे यांनी न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर भंडारे याची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.