बसस्थानकातील कॅन्टीन जबरदस्तीने बंद केली; खंडपीठाची पोलिस निरीक्षकाला २५ हजारांची कॉस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 02:08 PM2023-06-29T14:08:23+5:302023-06-29T14:09:05+5:30
खंडपीठाच्या आदेशाचे उल्लंघन; कॅन्टीन रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत चालू ठेवण्याची मुभा
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शॉप ॲक्टमधील तरतुदीनुसार बीडच्या मध्यवर्ती बसस्थानकातील कॅन्टीन रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत चालू ठेवण्याची सूट खंडपीठाने २ मे २०१४ रोजी दिली आहे. असे असताना मागील महिनाभरापासून सदर कॅन्टीन जबरदस्तीने ११ वाजेपूर्वी बंद करायला लावून खंडपीठाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल बीडचे सहायक पोलिस निरीक्षक ए.जी. गुरुले यांनी २५ हजार रुपये ‘कॉस्ट’ म्हणून जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी दिला.
ही रक्कम जमा झाल्यानंतर याचिकाकर्त्यास ती काढून घेण्याची परवानगी खंडपीठाने दिली आहे, तसेच याचिकाकर्त्यास रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत बसस्थानकातील कॅन्टीन चालू ठेवण्याची मुभा दिली आहे. बीड येथील मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीन राम बापूराव हराळ चालवितात. त्यांच्याकडे ‘महाराष्ट्र शॉपस् ॲन्ड एस्टॅब्लीशमेंट ॲक्ट’चा वैध परवाना आहे. तसेच एस.टी. महामंडळाने सुद्धा मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीन चालविण्याचा परवाना दिला आहे.
वरील कायद्याच्या कलम ४ नुसार शेड्युल-२ मधील रेल्वे स्थानक, बंदरे, विमानतळ आणि एस.टी. स्थानकावरील स्टॉल्स, रिफ्रेशमेंट रूम आणि कॅन्टीन यांना वेळेत सूट देण्यात आली आहे. या तरतुदींचा विचार करून खंडपीठाने २ मे २०१४ रोजी याचिकाकर्त्याला रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत कॅन्टीन चालविण्याची मुभा दिली होती. असे असताना सहायक पोलिस निरीक्षक गुरुले यांनी कॅन्टीन बंद करण्यासाठी सक्ती केली होती. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. जनार्दन. एम. मुरकुटे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. अल्केश जाधव, ॲड. जमीरखान पठाण, ॲड. पूजा देशमुख व ॲड. गोरख केंद्रे यांनी सहकार्य केले.