चोरीला गेलेल्या बारा दुचाकींसह दोन तलवारी, बंदूक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:55 AM2017-07-27T00:55:25+5:302017-07-27T00:55:25+5:30
जिंतूर : तालुक्यात दुचाकी चोरीचा तपास करीत असताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, या तिघांकडून बारा दुचाकी, दोन तलवारी, एक गन आणि ५ नंबर प्लेट जप्त केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : तालुक्यात दुचाकी चोरीचा तपास करीत असताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, या तिघांकडून बारा दुचाकी, दोन तलवारी, एक गन आणि ५ नंबर प्लेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, २५ जुलै रोजी न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिंतूर शहरातील देवेंद्र बनकुरे यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. यापूर्वीही दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या असल्याने जिंतूर येथे दुचाकी चोरीचा शोेध लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. चोरी प्रकरणाचा तपास करीत असताना २३ जुलै रोजी या पथकाने अनिकेत दिगंबर जगताप (२०, रा.पुंगळा) याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली देत आणखी तीन दुचाकी पोलिसांकडे दिल्या. २४ जुलै रोजी या पथकाने अनिकेतचा साथीदार सय्यद वाजीद सय्यद गफूर ऊर्फ सलमान (२६, रा.टिपू सुलतान चौक, जिंतूर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करुन त्याच्याकडून ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोन धारदार तलवारी, दोन जांबिया, एक एअर गन, ५ नंबर प्लेट असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याने पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेत २५ जुलै रोजी आदिनाथ रामदास बैकारे यास अटक केली. पोलिसांनी या तिन्ही आरोपींच्या ताब्यातून बारा दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, २६ जुलै रोजी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.