क्षमता वाढली; औरंगाबादमधील अलगीकरण कक्ष आता कोविड उपचार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 03:57 PM2020-07-01T15:57:03+5:302020-07-01T16:00:56+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा रुग्णांवर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने शहरातील जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासणीवर भर दिला आहे. मागील चार महिन्यांत सोमवारी प्रथमच ५२६ संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. तपासणी आकडा आणखी वाढविण्यात येणार असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही पुढील दिवसात वाढणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी मंगळवारी महापालिकेने अलगीकरण कक्षांचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात करण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दुपारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, टास्क फोर्सच्या प्रमुख अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची उपस्थिती होती. पॉझिटिव्ह आलेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा रुग्णांवर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे तातडीने नवीन १,३६२ बेडची व्यवस्था करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अलगीकरण कक्षांमध्ये संशयित रुग्ण ठेवण्यासाठी जागा वाढविण्याचा आणि नवीन काही केंद्र सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
युद्धपातळीवर काम सुरू करा
अलगीकरणासाठी कलाग्राम येथे संपूर्ण १५० खोल्या सुरू करणे, नवखंडा महाविद्यालय, देवळाई आणि नक्षत्रवाडी येथील म्हाडा स्कीमअंतर्गत बांधलेल्या रिकाम्या खोल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसतिगृह, इतर महाविद्यालयात आणि त्यांचे वसतिगृह अलगीकरण केंद्र करण्यासाठी अधिग्रहित करण्यासाठी सूचना केल्या.
नवीन उपचार केंद्र
देवगिरी मुलांच्या वसतिगृहात १७८ बेड, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांचे वसतिगृह १०० बेड, साई वसतिगृह १५० बेड, महाराष्ट्र उद्योजक महामंडळ ५२ बेड, हॉलिडे कॅम्प १२० बेड, जामा मशीद १५० बेड, गारखेडा क्रीडा संकुल ३०० बेड, शासकीय तंत्रनिकेतन १०० बेड, शासकीय अभियांत्रिकी मुलींचे वसतिगृह १०० बेड, सी ब्लॉक एमजीएम २०० बेड, तसेच महापालिकेचे सुरू असलेले किलेअर्क सीसीसी सेंटरमध्ये ३०० बेड, एमआयटी मुलांचे वसतिगृह २०० बेड, एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स ७० बेड, ईओसी पदमपुरा ४५ बेड, सीसीसीमध्ये ३०० बेड, असे सर्व मिळून सुमारे १,३६२ लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले आहे.