राेज ४० हजार नागरिकांना लस देण्याची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:04 AM2021-07-02T04:04:41+5:302021-07-02T04:04:41+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात रोज ४० हजार नागरिकांना लस देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे. या क्षमतेनुसार लस दिली तर अवघ्या ...
औरंगाबाद : जिल्ह्यात रोज ४० हजार नागरिकांना लस देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे. या क्षमतेनुसार लस दिली तर अवघ्या दोन महिन्यांत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना पहिला डोस देणे शक्य आहे. मात्र, त्या प्रमाणात लसींचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण कधी पूर्ण होईल, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात २६ जून रोजी आरोग्य यंत्रणेने दिवसभरात तब्बल २९ हजार ९३१ नागरिकांचे लसीकरण केले. लसीकरणाची ही उच्चांकी संख्या ठरली; परंतु त्यानंतर पुन्हा लसींच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला व लसीकरण ठप्प झाले. जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यांत पहिला आणि दुसरा असे ८ लाख ३० हजार डोस देऊन पूर्ण झाले आहे. जिल्ह्याच्या क्षमतेनुसार लसी मिळाल्या तर दोन महिन्यांत लसीकरण पूर्ण होऊन तिसऱ्या लाटेला रोखणे शक्य होऊ शकते.
------
लसी उपलब्ध होणार
कोविशिल्ड लस उपलब्ध होणार आहे. लस उपलब्ध होताच लसीकरणाचे नियोजन केले जाईल. ग्रामीण भागात कोव्हॅक्सिन १० हजार आणि शहरात कोव्हॅक्सिन जवळपास ३ हजार उपलब्ध आहे. दुसरा डोस असणाऱ्यांनाच या लसींचा प्राधान्यक्रम आहे.
- डाॅ. महेश लड्डा, नोडल ऑफिसर, कोविड लसीकरण
लसीकरणाची स्थिती
-जिल्ह्याची लोकसंख्या-४५ लाख ४१ हजार
-१८ वर्षांवरील नागरिक- ३२ लाख ८७ हजार
-लसीचा पहिला डोस घेतलेले नागरिक-६ लाख ६७ हजार २२८
- लसीचा दुसरा डोस घेतलेले नागरिक- १ लाख ६३ हजार १४६
-आतापर्यंत मिळालेले कोविशिल्ड लसीचे डोस-७ लाख ९० हजार ३५४
- आतापर्यंत मिळालेले कोव्हॅक्सिन लसीचे डोस- ६५ हजार ५९०