नावालाच पर्यटनाची राजधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:08 AM2017-09-27T01:08:46+5:302017-09-27T01:08:46+5:30
जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने ऐतिहासिक औरंगाबाद शहराला काही वर्षांपूर्वी पर्यटनाची राजधानी असा दर्जा दिला. पर्यटनाच्या राजधानीचे दु:ख आजपर्यंत शासन दरबारी पोहोचले नाही. पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शासनाकडून एक रुपयाचीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.
जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद किल्ला या मोजक्याच पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होतात. शहरात आलेले पर्यटक एकच दिवस थांबतात, त्यानंतर ते अन्य शहरांतील पर्यटन स्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढावा यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न आजपर्यंत झालेले नाहीत.
ऐतिहासिक औरंगाबादनगरीत पर्यटक दाखल झाल्यानंतर त्यांना ज्या मूलभूत सोयी-सुविधा मिळायला हव्यात त्याच मिळत नाहीत. शासकीय यंत्रणेसोबत राजकीय मंडळींची अनास्था याला कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक शहरात दाखल होतात. यातून पर्यटन विकास महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला.