पर्यटनाच्या राजधानीत आहेत ३०० प्रकारचे पक्षी; अजिंठा लेणी परिसरात आहेत सर्वाधिक पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 08:28 PM2019-01-10T20:28:56+5:302019-01-10T20:36:49+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून ...
औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून येतात. विशेष म्हणजे येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात सर्वाधिक पक्षी आहेत; पण त्यातही बुलबूल पक्ष्यांची मोठी वसाहत याच ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.
जैवविविधतेसाठी औरंगाबाद जिल्हा समृद्ध आहे. त्याची प्रचीती या हंगामात सर्वांना येत आहे. जायकवाडीचे धरण, सुखना, नांदूर मधमेश्वर, गौताळा अभयारण्य आदी भाग पक्षीमित्रांसाठी पर्वणीच ठरत आहे. एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन अॅण्ड एज्युकेशनल अकॅडमीचे संस्थापक पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३०० प्रजातींच्या पक्ष्यांपैकी ८४ ते ८५ प्रकारचे पक्षी हे विदेशी आहेत. देशातील व विदेशातील पक्षी हजारो कि.मी.चा प्रवास करून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात पाहुणे म्हणून येतात आणि त्यांचा फेब्रुवारीपासून परतीचा प्रवास सुरू होऊन जातो. मार्च अखेरपर्यंत सर्वजण येथून निघून जातात.
फ्लेमिंगो हे सौराष्ट्रातून येतात. शोवलर्स हे दक्षिण युरोप, पूर्व सायबेरियामधून शोेवलर्स पक्षी, गोडविटस् पूर्व सायबेरियामधून येथे येतात. यांसारखे अनेक विदेशी पक्षी येथे दिसतात. १८ प्रकारचे बदक आढळून आले आहे. त्यातील १६ प्रकारचे बदक हे स्थलांतरित आहेत. त्यातील बहुतांश बदक एशियामधून जिल्ह्यात येतात. या काळात तिकडे बर्फ पडत असतो. अन्नाच्या शोधासाठी हजारो कि.मी.चा प्रवास करीत ते येथे येतात. कारण, आपल्या जिल्ह्यात पाणथळी आहेत. यंदा दुष्काळ असला तरी जायकवाडीत पाणी आहे. विविध फळझाडेही जिल्ह्यात आहेत. पक्ष्यांसाठी पोषक वातावरण असल्याने विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात. पक्ष्यांच्या रक्षणासाठी त्यांना भयमुक्त वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत यार्दी यांनी व्यक्त केले.
अजिंठ्यात नवीन विकास आराखडा
एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी सांगितले की, अजिंठ्यात नवीन विकास आराखडा पूर्ण झाला आहे. तो निसर्गानुकूल केला आहे, तसेच २००२ पासून लेणी परिसरात येणाऱ्या गाड्यांवर बंदी आणली आहे. प्रदूषणविरहित गाड्यांना प्रवेश दिला जात आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबविण्यात यश आले आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या वाढू लागली आहे. यात बुलबूल पक्ष्यांची संख्या एवढी वाढली आहे की, बुलबूल वसाहतच निर्माण झाली आहे.
पक्षी वाढविण्यासाठी काय करावे
- नागरिकांनी वृक्ष, झुडपे लावावीत.
- फळे, फुले असलेली वृक्षे लावावीत.
- उन्हाळ्यात गच्चीवर, झाडाच्या फांदीला पाणी असलेली मातीची भांडी लटकवून ठेवावीत.
माणसे पक्ष्यांशिवाय जगू शकत नाहीत
पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले की, निसर्गसंवर्धनाचे कार्य पक्षी मोठ्या प्रमाणात करतात. पक्षी माणसांशिवाय जगू शकतात; पण माणसे पक्ष्यांशिवाय जगू शकत नाहीत.