शिक्षणात भांडवलदारांची घुसखोरी
By Admin | Published: January 1, 2017 11:42 PM2017-01-01T23:42:06+5:302017-01-01T23:47:47+5:30
लातूर : देशभरातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी व्यवसाय म्हणून घुसखोरी केल्यामुळे शिक्षणाचे मूल्य आणि दर्जा घसरत चालला आहे
लातूर : देशभरातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी व्यवसाय म्हणून घुसखोरी केल्यामुळे शिक्षणाचे मूल्य आणि दर्जा घसरत चालला आहे. देशभरातील शिक्षणात संधी, गुणवत्ता आणि समानता आणण्यासाठी आता जागरुक नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत गोवा येथील विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी लातुरात रविवारी व्यक्त केले.
दयानंद सभागृहात झालेल्या दुसऱ्या विवेक जागर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विचार मंचावर डॉ. सतीश यादव, डॉ. मा. मा. जाधव, डॉ. संजय वाघमारे, डॉ. कमलाकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
तेलतुंबडे म्हणाले, ज्यांचा शिक्षणाचा काडीचाही संबंध नाही, अशांनी आता शिक्षणक्षेत्रावर आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे. सध्याच्या शिक्षणाचे धोरण भांडवलदार मंडळी ठरवू लागली आहेत. परिणामी, श्रमिक, दलित, शोषित, वंचित आणि पीडित वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. ‘ज्यांच्या खिशात पैसा त्यांचे शिक्षण’ ही नवी पध्दत आता रुढ झाली आहे. त्यामुळे शिक्षणातील समानता संपुष्टात आल्याने दर्जाही घसरला आहे. दुसऱ्या सत्रात ‘समकालीन भारतीय शिक्षण धोरण’ या विषयावर प्रा. डॉ. किशोर ठेकेदत्त, मुंबई तर ‘मुक्तीदायी शिक्षणाच्या दिशेने’ या विषयावर प्रा. डॉ. श्रीकांत काळोखे अहमदनगर यांनी पुष्प गुंफले. सूत्रसंचालन नागेश पाटील तर आभार प्रा. किशन कुकडे यांनी मानले.
अहमदनगर येथील प्रा. डॉ. श्रीकांत काळेखे यांनी भांडवली शिक्षण व्यवस्थेवर हल्ला चढविला. ग्रामीण आणि आदिवासी भाषेला, संस्कृतीला अभ्यासक्रमात महत्व नाही. त्याला मान्यता नाही. त्यांच्या सोईची आणि कष्टकरी, पीडित अन् बहुजनांच्या विद्यार्थ्यांना नाउमेद करणारे शैक्षणिक धोरण बदलले पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)