समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 06:29 PM2024-04-30T18:29:06+5:302024-04-30T18:29:22+5:30
माळीवाडा गावाजवळील घटना : जखमींवर घाटीत उपचार सुरू
दौलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : लग्न उरकून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या कारला अपघात होऊन एकाच कुटुंबातील एकजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतांत १३ वर्षीय मुलाचा समावेश असून आई-वडील, बहीण जखमी आहे. ही घटना मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील माळीवाडा गावाजवळ मंगळवारी पहाटे घडली.
सोहम ज्ञानेश्वर पाटील (वय १३ वर्षे, रा. मयूर पार्क, हर्सूल टी पॉइंट, छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मधुकर पाटील हे आपल्या कुटुंबासोबत कारने (एमएच २० -ईई ०५१४) मालेगाव येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. लग्न उरकून छत्रपती संभाजीनगरकडे परत येत असताना त्यांची कार समृद्धी मार्गावरील माळीवाडा गावाजवळ आली होती. परंतु या ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम चालू होते. या रस्त्याचा चालकाला अंदाज न आल्याने मंगळवारी पहाटे २ वाजता कार जोरदार आदळून अपघात झाला. यात ज्ञानेश्वर (वय ५६ वर्षे) यांच्यासह मुलगा सोहम, पत्नी नम्रता (वय ४८ वर्षे), मुलगी साक्षी (वय १८ वर्षे) हे चारजण गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच हायवे वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेऊन जखमींना समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून सोहम यास मृत घोषित केले. तर उर्वरित तीन जणांवर उपचार सुरू आहेत.
सोहमचा सहा दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस
ज्ञानेश्वर पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील हडको येथील बळीराम पाटील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मृत सोहम याचा २४ एप्रिल रोजी तेरावा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस कुटुंबीयांनी धूमधडाक्यात साजरा केला होता. परंतु वाढदिवसाच्या सहा दिवसानंतर ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.