कारमधून आले आणि गोमटेश मार्के टमधील दुकान फोडून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:26 PM2019-08-03T23:26:29+5:302019-08-03T23:27:00+5:30
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोमटेश मार्केटमधील पशुसेवा औषधालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी ४९ हजार ५५० रुपये चोरून नेल्याची घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. या दुकानाशेजारील अन्य दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी चोरट्यांनी कार वापरल्याचे समोर आले.
औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोमटेश मार्केटमधील पशुसेवा औषधालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी ४९ हजार ५५० रुपये चोरून नेल्याची घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. या दुकानाशेजारील अन्य दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी चोरट्यांनी कार वापरल्याचे समोर आले.
क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, व्यंकटेशनगर येथील अमोल रमेश झंवर यांचे गोमटेश मार्केटमध्ये पशुसेवा औषधालय आहे. ३१ जुलै रोजी रात्री त्यांनी दुकान बंद केले आणि ते घरी गेले. दुकानाचे शटर उचकटून चोरटे आत घुसले. गल्ल्यातील रोख ४९ हजार ५५० रुपये चोरून चोरटे पसार झाले. चोरट्यांनी याच मार्केटमधील अन्य दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला.
बिनधास्त चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद
चोरटे हे अट्टल गुन्हेगार असून ते बिनधास्त असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेल्या त्यांच्या हालचालीवरून दिसते, अशी माहिती पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली. ते म्हणाले की, चोरटे कार घेऊन औरंगाबादेत आले आणि चोरी केल्यानंतर कारमध्ये बसून निघून गेले. चोरी करताना चोरट्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता, यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत.
१५ दिवसांपूर्वी आले होते शहरात
१५ जुलैच्या रात्री कार घेऊन गुलमंडी परिसरात चोरटे आले होते. चितलांगे यांच्या दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटले होते. मात्र शटरच्या आतून जाड काच असल्याने चोरट्यांना आत जाता आले नाही. ३१ जुलै आणि १५ जुलै रोजीचे चोरटे एकच असल्याचे तपासात समोर आले. सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ आणि पथक चोरट्यांचा शोध घेत असल्याचे पो.नि.मुळक यांनी सांगितले.