चोरट्याने घातली गुन्हेशाखेच्या फौजदाराच्या अंगावर कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:22 PM2018-09-26T23:22:40+5:302018-09-26T23:23:14+5:30
औरंगाबाद : गुन्हेशाखेच्या पोलिसांनी हात दाखवून कार थांबविण्याचा इशारा केल्याने कारचालक चोरट्याने फौजदार व पोलिसाच्या अंगावर कार घालून त्यांना ...
औरंगाबाद : गुन्हेशाखेच्या पोलिसांनी हात दाखवून कार थांबविण्याचा इशारा केल्याने कारचालक चोरट्याने फौजदार व पोलिसाच्या अंगावर कार घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून त्यांनी बाजूला उड्या मारल्याने ते बचावले. नियंत्रण सुटल्याने कार कठड्यावर धडकून चोरटाही जखमी झाला. ही खळबळजनक घटना बुधवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संग्रामनगर उड्डाणपुलाखाली घडली.
अमोल बाबूराव खरात (२८,रा. तारांगण सोसायटी, पडेगाव) असे चोरट्याचे नाव आहे. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सांगितले की, रेकॉर्डवरील चोरटा अमोल खरात हा कारने शहानूरमियॉ दर्गाकडून जात असल्याची माहिती खबऱ्याने दिल्यानंतर गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक मारोती दासरे, कर्मचारी नसीम खान, फारुख देशमुख, खिल्लारी, वाहूळ, बबन इप्पर यांनी सायंकाळी संग्रामनगर उड्डाणपुलाखाली सापळा रचला होता. पाच वाजेच्या सुमारास पांढºया कारमधून (एमएच ०९ सीएन ५११७) संशयित आरोपी त्यांना येताना दिसला. पोलिसांनी हात दाखवून कार थांबविली. उपनिरीक्षक मारोती दासरे त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी ओळख सांगून वाहन चालविण्याचा परवाना दाखविण्यास सांगितला. कारसमोर पोलीस शिपाई बबन इप्पर उभे होते. यावेळी आरोपीने अचानक कार सुरू करून वेगात इप्पर यांच्या अंगावर आणली. प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेतल्याने इप्पर बचावले. पोलिसांनी त्याला गाडी थांबविण्याचे सांगूनही त्याने उपनिरीक्षक दासरे यांच्याही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. दासरे यांनी डाव्या बाजूला उडी घेऊन स्वत:चा बचाव केला. वेग अधिक असल्याने आरोपीचे नियंत्रण सुटले आणि तेथील कठड्याला धडकून कार बंद पडली. पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. याप्रकरणी आरोपीविरोधात सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.