धावती कार पेटली, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोघांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:44 PM2019-03-09T23:44:00+5:302019-03-09T23:44:32+5:30
कामानिमित्त औरंगाबादेत आलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील एका व्यक्तीच्या धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यात कार जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी २.४१ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथे घडली. कारच्या इंजिनमधून धूर निघू लागताच कारमालकासह त्यांच्या मित्रांनी वेळीच कार थांबवून खाली उतरल्याने ते बालंबाल बचावले.
औरंगाबाद : कामानिमित्त औरंगाबादेत आलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील एका व्यक्तीच्या धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यात कार जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी २.४१ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एपीआय कॉर्नर येथे घडली. कारच्या इंजिनमधून धूर निघू लागताच कारमालकासह त्यांच्या मित्रांनी वेळीच कार थांबवून खाली उतरल्याने ते बालंबाल बचावले.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, सिंदखेडराजा येथील गजानन लक्ष्मण कुडके हे कामानिमित्त औरंगाबादेत कारने (एमएच-२८ एएन-४७७४) आले होते. शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ते सिडको बसस्थानकाकडून चिकलठाण्याकडे कारने जात होते. सिडको पुलाखालून ते प्रवास करीत असताना त्यांच्या कारच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर प्रसंगावधान राखून त्यांनी एपीआय कॉर्नर येथील चौकातच कार उभी केली. कुडके आणि त्यांचे मित्र कारमधून खाली उतरले आणि क्षणार्धात आगीने कारला कवेत घेतले. तेथे वाहतूक नियमन करीत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना मोरे यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच सिडको चौकातील सहायक उपनिरीक्षक बी. एस. आरके, पोहेकॉ. जोगदंड, ए. आर. पालवे, घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांत अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन पेटलेल्या कारची आग विझविली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कार जळून कारचा केवळ सांगडाच राहिला होता.
चौकट
प्रत्यक्षदर्शींनी मोबाईलवर केले चित्रण
घटना घडली त्यावेळी तेथून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी जळणाºया कारचे मोबाईलमध्ये चित्रण केले. वाहनचालकांनी रस्त्यावरच वाहने थांबविल्याने तेथे वाहतूक कोंडी झाली होती. कारची आग विझविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील कारचा सांगडा एमआयडीसी सिडको ठाण्यात हलविला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अकमल शेख यांनी दिली.