ड्रोनच्या अफवेनंतर संशयावरून कारच्या काचा फोडल्या; चोरीच्या भीतीने ग्रामस्थ रात्रभर जागी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 07:03 PM2024-09-30T19:03:12+5:302024-09-30T19:03:26+5:30
शिवना परिसरातील आडगाव गावाजवळ एक कार जालन्याकडे जात असताना ग्रामस्थांनी चोरटे आल्याचे समजून या कारवर दगडफेक केली.
सिल्लोड : गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील विविध गाव परिसरात रात्री ८ ते ११ वाजेच्या सुमारास आकाशात अनेक ड्रोन घिरट्या मारत असल्याने नागरिक भयभीत झाले असताना शिवना येथे २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता आडगावजवळ चोराच्या संशयावरून ग्रामस्थांनी जालन्याकडे जाणाऱ्या एका कारच्या काचा फोडल्याची घटना घडली.
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, उंडणगाव, मांडणा, गोळेगाव, अजिंठा, शिवना, मादनी, पिंपळदरी, बाळापूर अजिंठा लेणी आदी भागांत तीन दिवसांपासून रात्री ८ ते ११ वाजेच्या सुमारास आकाशात अनेक ड्रोन घिरट्या मारत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे चोर चोरी करण्याच्या उद्देशाने ड्रोनद्वारे पाहणी करीत असल्याची अफवा पसरली. त्यामुळे ग्रामस्थ रात्रभर पहारा देत आहेत. या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता शिवना परिसरातील आडगाव गावाजवळ एक कार जालन्याकडे जात असताना ग्रामस्थांनी चोरटे आल्याचे समजून या कारवर दगडफेक केली. यात कारच्या काचा फुटल्या. कारमध्ये तीन जण होते. घाबरून चालकाने भरधाव वेगाने कार नेत स्वत:चा जीव वाचवला.
अजिंठा लेणी परिसरात ३ ड्रोनद्वारे पाहणी
संवर्धन व संरक्षणासाठी अजिंठा लेणीच्या तीनशे मीटर अंतराच्या आत केंद्र व राज्य शासनाने ड्रोन उडविण्यास निर्बंध घातले आहेत. असे असताना शुक्रवारी (दि. २७) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास लेणीत ३ ड्रोनने घिरट्या घातल्या. यामुळे खळबळ उडाली. लेणी परिसराची ३७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून मार्फत सुरक्षारक्षक, कर्मचारी व पोलिसांच्या माध्यमातून येथे २४ तास निगरानी केली जाते. असे असतानाही ३ ड्रोनद्वारे टेहळणी झाल्याने पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील, स.पो.नि. प्रफुल्ल साबळे यांनी लेणीत धाव घेतली. यावेळी तीन ड्रोन कॅमेरे लेणी, सप्तकुंड धबधबा व व्हयू पॉइंट परिसरात घिरट्या घालताना दिसून आले. रात्री एक वाजेपर्यंत त्यांनी संपूर्ण लेणी परिसर पिंजून काढला. सुरक्षेच्या दृष्टीने लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरातही सुरक्षाकर्मी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मनोज पवार संवर्धन सहायक भारतीय पुरातत्त्व विभाग यांनी दिली.
ड्रोनसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
जिल्हाधिकारी कार्यालयाचे १६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत कन्नड, सिल्लोड, पैठण व वैजापूर तालुक्यातील काही ठराविक गावांत एका कंपनीला ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे नागरिकांनी घाबरू नये व अफवा पसरवू नये.
-अमोल ढाकणे, सहायक पोलिस निरीक्षक