कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल ; औरंगाबाद जिल्हा पुन्हा लॉकडाऊनकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 07:20 PM2021-06-26T19:20:13+5:302021-06-26T19:26:33+5:30
शासनाच्या आदेशानुसार शहर आणि जिल्हा तिसऱ्या स्तरात आले आहे, त्यामुळे कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी टक्केवारी आणि ऑक्सिजन बेडवर किती रुग्ण आहेत, हा मुद्दा आता विचारात घेतला जाणार नाही.
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात आला आहे. याबाबत सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. सर्व आस्थापनांना दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या जातील. शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल. इतर दिवशी जमावबंदी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या आदेशानुसार शहर आणि जिल्हा तिसऱ्या स्तरात आले आहे, त्यामुळे कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी टक्केवारी आणि ऑक्सिजन बेडवर किती रुग्ण आहेत, हा मुद्दा आता विचारात घेतला जाणार नाही. ( Aurangabad district again towards lockdown)
दरम्यान डेल्टा प्लसची लागण झालेला रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळला असून जळगावकडून जिल्ह्याकडे येणाऱ्या सर्व सीमांवर वाहनांच्या कडक तपासणीच्या अनुषंगाने अँटिजन, आरटीपीसीआर करण्यास शुक्रवारपासूनच तयारी सुरू केली आहे. ७ जूनपासून कोरोनोच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू केलेले लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. शासनाच्या ५ जूनच्या वर्गवारीनुसार मनपा हद्द पहिल्या स्तरात आल्यामुळे शहराचा आर्थिक उलाढालीचा गाडा रुळावर आला. जमावबंदी आणि संचारबंदी मागे घेण्यात आल्यानंतर सगळे काही आलबेल सुरू झाले. त्यातच २१ जून रोजी जिल्ह्यातील निर्बंध मागे घेऊन ग्रामीण भागही तिसऱ्या स्तरातून पहिल्या स्तरात आणला. १८ दिवसांत पुन्हा जिल्हा शासनाच्या आदेशासनुसार तिसऱ्या स्तरात गेला असून, आता आंतरजिल्हा प्रवासावर देखील निर्बंध येणार आहेत.
तिसऱ्या स्तराचे नियम असे
५ जून रोजी राज्य शासनाने अनलॉक करण्यासाठी पाच स्तर जाहीर केले होते. त्यानुसार औरंगाबाद शहर पहिल्या आणि जिल्हा तिसऱ्या स्तरात होता. तिसऱ्या स्तरात पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले असतील तर या स्तरातील पूर्ण नियम संबंधित जिल्ह्याला लागू होतील, असे शासनाने स्पष्ट केले होते. सध्या शहराचा कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट ०.९४ टक्के आहे, तर ग्रामीण भागाचा २.३ टक्के आहे. ऑक्सिजन बेडवर २० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत. त्यामुळे सोमवारी काय निर्णय होणार याकडे लक्ष असले तरी या टक्केवारीला आता काही फारसे महत्त्व राहणार नाही.
६ व २१ जून रोजी असलेली परिस्थिती अशी
महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची पॉझिटिव्ह टक्केवारी २.२४ टक्के होती. ऑक्सिजन बेडवर २२.१९ टक्के रुग्णांची नोंद ६ जून रोजी होती. त्यामुळे शासन वर्गवारी नुसार शहर पहिल्या स्तरात आले. २१ जून पासून ग्रामीण भागातील रुग्णांची पॉझिटिव्हिटी २.९४ टक्के तर ऑक्सिजन बेडवर ६ टक्के असल्याने ग्रामीण भाग पहिल्या स्तरात आला होता. २८ जून पासून शहर व जिल्हा तिसऱ्या स्तरात येणार असल्याने व्यवहारास वेळेची बंधने येणार आहेत.
शहरात या घटकांना दिलेली आहे परवानगी
तिसऱ्या टप्प्यात शहराचा समावेश सोमवारपासून होणार असल्याने वेळेची आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधने येणार आहेत. सध्या अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी दुकाने, इतर व्यवसाय व दुकाने, मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी केंद्र, सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बाग, सायकलिंग, मॉर्निंग वॉकिंगसाठी परवानगी आहे. खाजगी आस्थापना सर्व नियम पाळून १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यासह शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये नियमांसह १०० टक्के सुरू करण्यास परवागनी दिली आहे. क्रीडाप्रकार, चित्रीकरण, स्नेहसंमेलन, सामाजिक, सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम, विवाह समांरभ, अंत्यविधी, सभा, निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्थांच्या आमसभांना सर्व नियम पाळून परवानगी दिलेली आहे. बांधकाम, कृषी संबंधित सर्व बाबी, ई-कॉमर्स सेवा, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमितपणे उघडण्यास परवानगी शहरात दिलेली आहे. पण सोमवारी कोणते निर्बंध लागू होतील, याकडे लक्ष आहे.
ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरातील नियम असे होते
२१ जून पर्यंत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, व्यवसायाची दुकाने दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती. या व्यतिरिक्त दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत याच वेळेत सुरू होती. मॉल्स, चित्रपट, नाट्यगृहे पूर्णपणे बंद होते. रेस्टारंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन केंद्र सकाळी ७ ते सायं.४ या वेळेत ५० टक्के डायनिंग क्षमतेत सुरू होते. ४ वाजेनंतर पार्सल सेवा सुरू असेल, शनिवार, रविवार फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीला मुभा देण्यात आली होती. सर्व उद्याने, मैदाने रोज पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत खुली करण्यात आली होती. खाजगी आस्थापना नियमित वेळेत सुरू राहण्यासह सर्व कार्यालयात (कोरोना फ्रंट वर्कर वगळून) ५० टक्के उपस्थितीत तर क्रीडा प्रकारांसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायं.६ ते ९ वेळेत मुभा दिली होती. विवाह सोहळ्यांना ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध होते. तर अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी दिली होती. सोमवारपासून पूर्ण जिल्ह्यात असेच नियम लागू होतील, अशी शक्यता आहे.