करिअर सोपं, लग्न जमणं अवघड; गावातले सोडा शहरातील मुलांना देखील मुली मिळेनात

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 14, 2022 06:02 PM2022-11-14T18:02:19+5:302022-11-14T18:03:01+5:30

लग्नाचे वय चालले निघून; समाज कोणताही असो, पण शिक्षणामुळे तरुणींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Career is easy, marriage is difficult; not even village boys city boys can get girls for marriage | करिअर सोपं, लग्न जमणं अवघड; गावातले सोडा शहरातील मुलांना देखील मुली मिळेनात

करिअर सोपं, लग्न जमणं अवघड; गावातले सोडा शहरातील मुलांना देखील मुली मिळेनात

googlenewsNext

औरंगाबाद : ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातील तरुणांचे लग्नाचे वयसुद्धा निघून चालले आहे. वयाची चाळिशी ओलांडली, तरी लग्न होत नसल्याने आता लोक त्यांना घोडनवरदेव असे चिडवत आहेत. मात्र, अशामुळे या विवाहेच्छुकांच्या मनात न्यूनंगड निर्माण होत आहे. त्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यासही समाजाला वेळ नाही. कारण, तरुणींना मुंबई-पुणे, बंगळुरू अशा शहरांत स्थायिक असलेला गलेलठ्ठ पगार असणारा जोडीदार हवा आहे. एवढेच नव्हे तर त्याच्याकडे शेतीसुद्धा असली पाहिजे, या अटीमध्ये न बसणाऱ्या तरुणांना जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे अनुरूप, आपल्या अपेक्षांना पात्र जोडीदार मिळत नसल्याने तरुणींचे लग्नाचे वय वाढत असून, अशा असंख्य तरुणीही ‘स्वप्नातील राजकुमारा’ची प्रतीक्षा करत आहेत.

स्वप्नातील राजकुमाराबदल तरुणींच्या अपेक्षा १) आयटी कंपनीतील, लाखोंचे पॅकेज पाहिजे. २) पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद अशा शहरांतीलच असावा. ३) शासकीय नोकरी असल्यासही उत्तम. ४) जोडीदार शेतकरी नको, पण त्याच्याकडे शेती असावी. ५) घर स्वत:चे असावे, चारचाकी गाडी असावी. ६) आईवडील, नणंद यांना सोडून बाहेरगावी नोकरी करणारा असावा. ७) मुलगा दिसायला अनुरूप व निर्व्यसनी असावा. ८) आठवड्यातून एकदा तरी हॉटेलमध्ये घेऊन जाणारा असावा.

सर्वच समाजात मुली मिळणे कठीण
समाज कोणताही असो, पण शिक्षणामुळे तरुणींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक तरुणी नोकरी करून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. बहुतांश तरुणी उच्चशिक्षण घेत आहेत. यामुळे त्यांच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. बंधनमुक्त वातावरणात त्यांना संसार करायचा आहे.

शेतकरी मुलांची अवस्था अधिक वाईट
शेतकरी मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलाकडे शेती असावी, पण त्याला नोकरीही असली पाहिजे. या तरुणींच्या अपेक्षामुळे शेतकरी तरुणांचे वय वाढत आहे. तरुणांमध्ये निराशा निर्माण होत आहे.

वयाची चाळिशी ओलांडली, तरी लग्नाच्या प्रतीक्षेत
आमच्याकडे विवाहेच्छुकांची नावे येत असतात. यात ४० टक्के तरुणांनी वयाची चाळिशी पार केली आहे. अशाही काही तरुणी आहेत, त्यांच्या अपेक्षानुसार नवरा मिळत नसल्याने त्यांनी वयाची तिशी ओलांडली आहे.
- सुधीर नाईक, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नि:शुल्क वधू-वर केंद्र

माझ्यापेक्षा जास्त पगार असलेला मुलगा पाहिजे
आजघडीला आमच्याकडे ४० हजारांपेक्षा जास्त विवाह इच्छुक तरुण-तरुणींचा ‘बायोडेटा’ आहे. मुलांप्रमाणे मुलीही उच्चशिक्षित आहेत. ‘आयटी’त मुलीला २० लाखांपर्यंत पॅकेज असले, तर तिची अपेक्षा २५ ते ४० लाखांचे पॅकेज असणारा जोडीदार मिळावा, अशी आहे. यामुळे कमी शिक्षण असलेल्यांचे सोडा, पण उच्च शिक्षितांचेही लग्न लांबत आहेत.
- सुनील वायकोस, सकल जैन वधू-वर परिचय मेळावा.

Web Title: Career is easy, marriage is difficult; not even village boys city boys can get girls for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.