कोरोना योद्ध्यांची हेळसांड; उपहारगृह बंद असल्याने 'स्वाराती'च्या निवासी डॉक्टरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 06:51 PM2020-08-06T18:51:29+5:302020-08-06T19:29:33+5:30
रोना योद्ध्यांची हेळसांड सहन केली जाणार नसून त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मार्ड संघटनेने दिला आहे.
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे उपहारगृह एक महिन्यापासून बंद आहे. ‘मार्ड’च्या शिफारशीनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही उपहारगृह सुरु होत नसल्याने निवासी डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना योद्ध्यांची हेळसांड सहन केली जाणार नसून त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मार्ड संघटनेने दिला आहे.
स्वाराती रुग्णालयात रुग्णसेवेत निवासी डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. निवासी डॉक्टर पूर्णवेळ सेवा देत असल्यामुळे रुग्णालयातील बहुतांशी विभाग सुस्थितीत आहेत हे नाकारता येणार नाही. सध्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातही जीव धोक्यात घालून निवासी डॉक्टर पूर्ण योगदान देत आहेत. त्यापैकी काहींना कोरोनाची लागण देखील झाली आहे. तरीसुद्धा उर्वरित डॉक्टर तेवढेच जोमाने काम करतात. मात्र, या योद्ध्यांवरच उपासमारीची वेळ आली आहे. निवासी डॉक्टरांसाठी असलेले उपहारगृह मागील एक महिन्यापासून बंद आहे. हे उपहारगृह कोणाला चालविण्यास द्यायचे किंवा स्वतः चालवायचे याबाबत शिफारस करण्याचे अधिकार निवासी डॉक्टरांच्या संघटनेला (मार्ड) आहेत. मात्र, मार्डच्या शिफारशीने निविदेची प्रक्रिया पूर्ण करून महिला उलटून गेला तरीही उपहारगृह सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे सकस आहाराअभावी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने निवासी डॉक्टर आजारी पडून त्यांना कोरोनाची लागण होत आहे.
याबाबत मागील आठ दिवसापासून अधिष्ठातांना वारंवार विनंती करूनही त्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यापुढे कोणत्याही निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्यास त्याची जिम्मेदारी सर्वस्वी प्रशासनावर असेल. त्यामुळे दोन दिवसात उपहारगृह सुरु न झाल्यास नाईलाजाने संपावर जाण्याचा इशारा संघटनेने मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, संचालक, जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर ‘स्वाराती’च्या मार्डचे अध्यक्ष डॉ. विजय पवार आणि सचिव डॉ. पुष्पदंत रुग्गे यांच्या सह्या आहेत.
राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे विलंब?
शासन आदेशानुसार वैद्यकीय महाविद्यालयातील उपहारगृह विद्यार्थी संघटनेला ठेकेदार नेमून अथवा स्वतः चालविण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार स्वारातीच्या मार्ड संघटनेने नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून एका ठेकेदाराची निवड केली आहे. परंतु, एका बड्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला उपहारगृह चालविण्यास द्यावी यासाठी हस्तक्षेप करून दबाव आणल्यामुळेच उपहारगृह सुरु होण्यास विलंब होत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही काय खावे, आमच्या उपहारगृहाचा ठेकेदार कोण असावा हा सर्वस्वी अधिकार आमचा असताना असा हस्तक्षेप कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे.
आठ दिवसात उपहारगृह सुरु करणार : अधिष्ठाता
“रुजू झाल्यानंतर मी उपहारगृहाची पाहणी करून माहिती घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निवासी डॉक्टर जिथे राहत असतील तिथे त्यांना उत्कृष्ट दर्जाचे नाश्ता आणि जेवण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. मी स्वतः त्यांच्यासोबत जेवणार आहे. या प्रश्नाचा अधिक अभ्यास करून येत्या आठ दिवसांमध्ये उपहारगृह सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, संघटनेने सहकार्याची भूमिका घ्यावी.”
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय