लातुरात कॅरीबॅग बंदीचा फज्जा
By Admin | Published: May 22, 2017 12:03 AM2017-05-22T00:03:07+5:302017-05-22T00:04:45+5:30
लातूर : कॅरीबॅग मुक्त योजनेचा लातूर शहरात फज्जा उडाला असून, कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कॅरीबॅग मुक्त योजनेचा लातूर शहरात फज्जा उडाला असून, कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे. कॅरीबॅग वापरासंबंधी कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांकडे खुलेआम कॅरीबॅगचा वापर होत आहे.
महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात कॅरीबॅग वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र लातूर शहरात कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे. भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, हॉटेल चालक आदी जणांकडे ग्राहकांना कॅरिबॅग दिल्या जातात. ५० मायक्रॉनच्या आतील कॅरीबॅग खुलेआम वापरल्या जात आहेत. सध्या लग्नसराई सुरू असून लातूर शहरात यंदा मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे विविध मंगल कार्यालयात पार पडत असताना लग्नात अनिवार्य झालेले प्लास्टिक पाणीचे ग्लास, चहाचे ग्लास, वाटी, द्रोण, पत्रावळी आदी प्रकार खुलेआम वापरले जात आहेत. वास्तविक पाहता या वापरालाही बंदीे आहे.
कॅरीबॅग बंदी करण्याचे जर लातूर प्रशासनाने मनावर घेतले तर शहर प्रदूषणमुक्त होऊन पर्यावरण पूरक होईल, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. मात्र मनपा प्रशासनकडून कसलीही कारवाई होत नाही. प्रारंभीच्या काळात बंदी आदेश आल्यानंतर विक्रेत्यांकडील कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. काही दिवस कॅरिबॅगचा वापर पूर्णत: बंद झाला होता. मात्र आता मोहीम बंद झाल्याने कॅरिबॅगचा सर्रास वापर सुरू आहे. शहरातील ठिकठिकाणच्या नाल्यांमध्ये कॅरिबॅग व प्लास्टीकच्या वस्तू पडल्या आहेत. या वस्तूंमुळे नाल्याही तुंबलेल्या आहेत. यामुळे पर्यावरण संतुलनाची पुरती वाट लागली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या कॅरिबॅग शहरात जागोजागी दिसतात. विशेष म्हणजे मोकाट जनावरे या कॅरिबॅग्ज खात असल्याचेही दृश्य शहरात दिसते. तरीही प्रशासन मोहीम राबवीत नाही.