प्रथम वर्षाला कॅरिआॅन; एटीकेटीची मर्यादा वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:04 AM2017-08-22T01:04:05+5:302017-08-22T01:04:05+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याचा निर्णय घेतला. तर द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीची मर्यादा दहा टक्क्यांनी वाढविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याचा निर्णय घेतला. तर द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीची मर्यादा दहा टक्क्यांनी वाढविली आहे. या निर्णयासाठी एनएसयूआय, आरएसएफ या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी दिवसभर प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली. शेवटी सायंकाळी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर संघटनांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
विद्यापीठात मागील अनेक दिवसांपासून अभियांत्रिकीला कॅरिआॅन देण्याच्या मागणीसाठी आंदोलने करण्यात येत आहेत. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला (बाटू) संलग्न झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी कॅरिआॅन देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला होता. मात्र, विद्यार्थी संघटनांच्या श्रेयवादाच्या लढाईत द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही कॅरिआॅन देण्याची मागणी पुढे आली. यात रिपब्लिकन स्टुडंटस् फेडरेशनने प्रथम वर्षाच्या कॅरिआॅन आणि द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटी मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती. यानंतरही एनएसयूआयतर्फेही ही मागणी पुढे रेटण्यात आली. मात्र शनिवारी, रविवारी अभियांत्रिकीच्या प्राचार्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे एनएसयूआय, आरएसएफ संघटनेतर्फे सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनीही तगडा बंदोबस्त लावला. यामुळे कुलगुरूंनी अधिष्ठाता, प्राचार्यांची पुन्हा सायंकाळी बैठक बोलावली. या बैठकीत केवळ ‘बाटू’च नव्हे तर अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरसकट कॅरिआॅन देण्याचा निर्णय घेतला. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एकूण विषयाच्या ५० टक्के विषयांपर्यंत एटीकेटी देण्यात येणार आहे. याविषयीची माहिती विद्यापीठ प्रशासनाने कळविली.