चिखलात कार फसली अन चोरटे तावडीत सापडले; घरफोडीनंतर मौज करून निघाले होते मुंबईकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:59 PM2022-07-18T13:59:11+5:302022-07-18T13:59:59+5:30
घरफोडीनंतर समृद्धी महामार्गावर केली मौज; मुंबईकडे जाताना चिखलात गाडी फसल्याने चोरटे पकडले
औरंगाबाद : शिवाजीनगर येथील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडून तब्बल २२ लाख रुपयांच्या मुद्देमालावर ताव मारणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांची कार नारेगाव भागात चिखलात फसली. कार सोडून पळून जाणाऱ्या चोरट्यांना मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून तब्बल २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही चोरटे मुंबईला पळून जाण्याच्या बेतात होते, अशी माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
सेवानिवृत्त अधिकारी उदय जोशी आजारी बहिणीला पाहण्यासाठी पत्नीसोबत श्रीरामपूर येथे गुरुवारी (दि. १४) सकाळीच गेले होते. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी २९ तोळे सोने, १५३ ग्रॅम चांदी, दोन कॅमेरे, २६ हजार रोख, घरासमोर उभी कार घेऊन पोबारा केला होता. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. उपनिरीक्षक अजित दगडखैरे यांच्या पथकास जालना ते औरंगाबाद रोडवर चोरीची कार येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने केंब्रिज चौकात सापळा लावला. चोरीची कार झाल्टा फाट्याच्या पुलावर दिसली. ही कार नारेगावच्या रोडवर चोरट्यांनी नेली. कार रस्त्याच्या कडेच्या चिखलात फसली. चोरटे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी सपोनि. काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अजित दगडखैर, सहायक फाैजदार रमाकांत पटारे, अंमलदार सुनील बेलकर, अजय दहिवाळ, विजय घुगे, धनंजय सानप, दत्तात्रय गढेकर, ज्ञानेश्वर पवार, पूनम पारधी, प्रीती इलग आणि आरती कुसळे यांच्या पथकाने केली.
सीसीटीव्हीमुळे पटली ओळख
चोरट्यांनी कार घेऊन पोबारा केला. ही कार विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी फुटेज पाहताच चोरटे ओळखले. तसेच त्यांचा माग काढला. आरोपींमधील एका १७ वर्षांच्या युवकावर ६ आणि दुसऱ्या १४ वर्षांच्या आराेपीवर ४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना यापूर्वीही पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते.
समृद्धी महामार्गावर मौजमजा
चोरट्यांनी दागिन्यासह कार पळविल्यामुळे त्यांनी शुक्रवारी दिवसभर वाहन समृद्धी महामार्गावर फिरविले. त्यामुळेच चोरट्यांचे लोकेशन पोलिसांना मिळविण्यात यश आले. तसेच चोरटे गाडी घेऊन मुंबईला निघून जाणार होते. त्यादृष्टीने तयारी सुरू असतानाच गुन्हे शाखेने त्यांना पकडले.
दोन तोळे सोने फेकले
चोरट्यांनी एकूण २८९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्यातील दोन तोळ्यांचा एक हार बनावट सोन्याचा असल्याची शंका आल्यामुळे तो कचऱ्यात फेकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरातील सर्व कचऱ्यात मुद्देमाल शोधला तेव्हा त्यात चांदीच्या अंगठ्या आढळल्या. मात्र, दोन तोळे सोने सापडले नाही. उर्वरित सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.