ड्रेनेज चेंबरमध्ये ३ कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मालक, सुरक्षारक्षकावर गुन्हा
By राम शिनगारे | Published: May 9, 2023 07:35 PM2023-05-09T19:35:50+5:302023-05-09T19:36:08+5:30
घाटी रुग्णालयातून मृतदेह घेण्यास नातेवाइकांनी नकार दिल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते.
छत्रपती संभाजीनगर : अनधिकृतपणे महापालिकेच्या ड्रेनेज लाइनचे चेंबर उघडून दुरुस्त करण्यास चार कामगारांना सांगणाऱ्या सुरक्षारक्षक, बंगल्याच्या मालकाच्या विरोधात तीन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा सिटी चौक पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा नोंदविण्यात आला. दरम्यान, मंगळवारी घाटी रुग्णालयातून मृतदेह घेण्यास नातेवाइकांनी नकार दिल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी नातेवाइकांना समजावून सांगितल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत कामगारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपींमध्ये सुरक्षारक्षक शेख अजीम गुलाम रसूल (रा. आरेफ कॉलनी) आणि त्याचा मालक शेख कलिमोद्दीन शेख सलीमोद्दीन (रा. एन १२, सिडको) यांचा समावेश आहे. शेख कलीमोद्दीन यांच्या बंगल्याच्या पाठीमागील भागात महापालिकेचे ड्रेनेज तुंबले होते. ते ड्रेनेज उघडून दुरुस्त करण्यासाठी किरण दिलीप दाभाडे (रा. भीमराज नगर, हिमायतबाग) यास १५ हजार रुपयांत काम दिले होते. ड्रेनेजचे काम करीत असताना रावसाहेब घोरपडे, अंकुश थोरात, विष्णू उगले या तिघांचा मृत्यू झाला. विलास उर्फ बाळू खरात गंभीर जखमी झाला. शेख अजीम व शेख कलीमोद्दीन या दोघांनी कामगारांना ड्रेनेजचे काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षेची व्यवस्था न करता, निष्काळजीपणाचे व बेजबाबदारपणाचे कृत्य करून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचे किरण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर निरीक्षक दादाराव सिनगारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक निवृत्ती गायके अधिक तपास करीत आहेत.
...तर फौजदारी गुन्हा नोंदविणार
महापालिकेच्या जलनि:सारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून महापालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय जलनि:सारण वाहिनीची देखभाल, दुरुस्तीचे काम केल्यास संबंधित नागरिक, काम करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे कळविले आहे.