‘सुली डील्स’ ॲपचे व्टिटरवर समर्थन करणाऱ्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 07:37 PM2022-01-07T19:37:35+5:302022-01-07T19:38:14+5:30
छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
औरंगाबाद : वादग्रस्त ‘सुली डील्स’ ॲपचे सोशल मीडियात समर्थन आणि त्याच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, हा प्रकार सध्या गाजत असलेल्या ‘बुलीबाई’ ॲप प्रकरणाच्या पूर्वीचा आहे.
छावणी पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या ॲड. आस्मा शफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुलै २०२१ मध्ये सुली डील्स ॲप म्हणून एक संकेतस्थळ बनविण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सोशल मीडिया वापरणाऱ्या मुस्लीम समाजातील महिलांचे छायाचित्र विनापरवानगी डाऊनलोड करून घेत संकेतस्थळावर ऑनलाइन विक्रीसाठी अपलोड केले आहेत. त्यात या महिला विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यांच्यावर बोली लावा, असे म्हटले आहे. ५ जुलै २०२१ रोजी व्टिटरवर ‘डू पाॅलिटिक्स इन’चे संपादक आणि सहसंस्थापक अजित भारती नावाच्या व्यक्तीने सुली डील्स ॲप मी वापरतो व तुम्हीसुद्धा वापरा असे म्हणून ॲपचे समर्थन करीत ॲपची लिंक शेअर केली. या प्रकारातून मुस्लीम समाजातील महिलांच्या मनास लज्जा वाटेल आणि प्रतिष्ठाहनन करण्याचे काम करण्यात आले. याविषयी तक्रारकर्त्यांनी १३ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय महिला आयोग आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून छावणी ठाण्यात अजित भारतीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास निरीक्षक शरद इंगळे करीत आहेत.
समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
केंद्र सरकार मुस्लीम महिलांसाठी ट्रिपल तलाक मुद्द्यावर सहानुभूती दाखवते. त्याचवेळी सुली डील्स, बुलीबाई ॲप तयार करणाऱ्यांविरोधात एक शब्द बोलत नाही. त्यांच्या विरोधात कारवाई करीत नाही. हा प्रकार दोन समाजांत तेढ निर्माण करणारा आहे. पाच राज्यांतील निवडणुकीमुळे अशा पद्धतीचा द्वेष पसरविण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार ॲड. शेख यांनी पत्रकार परिषदेत केला.