औरंगाबादमध्ये ‘ओला-सुका’वेगळे करणारे वॉर्ड मजेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:34 PM2018-03-06T18:34:44+5:302018-03-06T18:45:36+5:30
शहरातील जवळपास पन्नासपेक्षा अधिक वॉर्डांमध्ये मागील काही वर्षांपासून सुका व ओला कचरा वेगळा करूनच जमा करण्यात येतो. या प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा याच वॉर्डांना होत आहे.
औरंगाबाद : शहरातील जवळपास पन्नासपेक्षा अधिक वॉर्डांमध्ये मागील काही वर्षांपासून सुका व ओला कचरा वेगळा करूनच जमा करण्यात येतो. या प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा याच वॉर्डांना होत आहे. ओला कचरा संबंधित वॉर्डातच शास्त्रोक्त पद्धतीने जिरविण्यात येत आहे. सुका कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे जमा करण्यात येतो. त्यामुळे या वॉर्डांना कचरा कोंडीचा अजिबात त्रास
नाही.
‘माझी सिटी टकाटक’अंतर्गत मागील दीड-दोन वर्षांपासून नताशा जरीन आपल्या सहकार्यांसह कठोर परिश्रम घेत आहेत. त्यांनी जवळपास ७० वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्याची शिस्त मनपा कर्मचारी आणि नागरिकांना लावली. याचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगण्यात आले. लोकसहभागातून उभी केलेली ही चळवळ चांगलीच हिट ठरली. त्यातील ५० वॉर्डांमध्ये आजही ओला व सुका कचरा वेगळाच जमा करण्यात येतोय. मनपा कर्मचारी हा ओला कचरा प्रभागात नेमून दिलेल्या जागेवर नेऊन शास्त्रोक्त पद्धतीने खत तयार करीत आहेत. सुका कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे कॅनपॅक कंपनीने उभारलेल्या शेडमध्ये आणून जमा होतो. येथे कचरा वेचक हे साहित्य उचलून नेतात. या सुका कचर्यावर शेकडो कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत, हे विशेष.
महापालिकेचे शहरात नऊ झोन आहेत. त्यातील झोन क्रमांक ४, ५, ६, ७, ८ आणि ९ मध्ये बर्यापैकी कचर्यावर प्रक्रिया होते. झोन १ ते ३ पर्यंत अजिबात कचर्याचे वर्गीकरण होत नाही. जुन्या शहरातील हे तिन्ही वॉर्ड आहेत. यामध्ये व्यापारी बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
या तीन झोनमुळे शहरात ठिकठिकाणी कचर्याचे डोंगर दिसून येत आहेत. ज्या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून जमा करण्यात येतो तेथे तर कचरा कोंडी आहे किंवा असा प्रश्न औरंगाबादकरांना पडत आहे.