नऊ वाळू तस्करांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:34+5:302021-06-16T04:06:34+5:30
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळूचा लिलाव झालेला नसताना सुद्धा दिवसरात्र वाळू तस्कर शासनाचा महसूल बुडवून नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू ...
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळूचा लिलाव झालेला नसताना सुद्धा दिवसरात्र वाळू तस्कर शासनाचा महसूल बुडवून नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत आहेत. याविरुद्ध परिसरातील असंख्य नागरिकांनी जिल्हा व तालुका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. यानंतर रविवारी (दि. १३ जून) जिल्हाधिकारी डॉ. सुनील चव्हाण, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, आदींनी पथकासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांना मोठ्या प्रमाणात नदीतून वाळूचे उत्खनन केल्याचे आढळून आले होते. वाळू साठा जप्त करून तत्काळ चोरट्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. यानंतर तालुका प्रशासनाने कडक पावले उचलली. गोदापात्रातून अवैधरीत्या कोणतीही परवानगी नसताना ४० ब्रास वाळू (किंमत २ लाख ४० हजार रुपये) उपसा करून त्याची विल्हेवाट लावली. याप्रकरणी विहामांडव्याचे मंडळ अधिकारी निहालसिंग बहुरे यांच्या फिर्यादीवरून सुभाष गंगाधर गांधले, ईस्लाम कमरअली शेख, इम्रान ख्वाजा शेख, स्वप्निल सुरेश तांबे, विकास विष्णू गांधले, आबेद शेख, रामेश्वर अनिल गांधले, गोरख वामन भोसले, संजय बाबासाहेब हराळे (सर्व रा. हिरडपूरी, ता. पैठण) या नऊ वाळू चोरट्यांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत सुतळे करीत आहेत.