चितेगाव अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल, दोघेही फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 08:03 PM2023-02-06T20:03:36+5:302023-02-06T20:04:29+5:30
चितेगावातील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात ८ महिन्यांपासून सुरू होता गोरखधंदा
चितेगाव (औरंगाबाद) : अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या चितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयाच्या डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध बिडकीन पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. सोनाली उद्धव काळकुंबे (रा.अंतरवाल सिंदखेड, ता. जि. जालना) व डाॅ. अमोल जाधव (रा. फुलंब्री), असे या डाॅक्टर दाम्पत्याचे नाव असून दोघेही फरार आहेत. आठ महिन्यांपासून येथे हा गोरखधंदा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पाडळी (ता.जि. बुलढाणा) येथील एका २७ वर्षीय महिलेची चितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात गर्भपात करताना प्रकृती गंभीर झाली. यानंतर सदर महिलेला तत्काळ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शनिवारी रात्री ८ वाजता आरोग्य विभाग व पोलिसांनी या रुग्णालयावर छापा टाकला असता गर्भपात करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री, ३७ प्रकारची औषधी, सिझर करण्याचे साहित्य, बाळाच्या हृदयाचे ठोके मोजणारे यंत्र, डिलिव्हरी बेड आदी साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, गर्भपात करणारे रुग्णालयातील डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजता बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार डॉक्टरांच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. रविवार अन्न व औषधी प्रशासन विभागाने काही नमुने तपासणीकरिता घेतले आहेत. पुढील तपास बिडकीन पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जगदीश मोरे करीत आहेत.