कोल्हापूर, ठाण्याच्या ‘त्या’ बनावट औषध पुरवठादारांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:08 IST2025-04-17T12:05:46+5:302025-04-17T12:08:09+5:30

चार महिन्यांपूर्वी अंबाजोगाईसह शहरात उघडकीस आला होता प्रकार

Case registered against 'those' fake medicine suppliers of Kolhapur, Thane | कोल्हापूर, ठाण्याच्या ‘त्या’ बनावट औषध पुरवठादारांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर, ठाण्याच्या ‘त्या’ बनावट औषध पुरवठादारांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा केल्याच्या घोटाळ्याप्रकरणी विशाल एंटरप्रायजेसच्या सुरेश दत्तात्रय पाटीलसह मिहीर त्रिवेदी (रा. ठाणे), काबीज जेनेरिक हाउसचा विजय शैलेंद्र चौधरी (रा. ठाणे) व केरळच्या स्कायक्युअर सोल्युशन्स कंपनीवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटीलने ‘क्युरेक्सिम-२००’ या बनावट गोळ्या पुरवठा केल्याचे डिसेंबर, २०२४ मध्ये उघडकीस झाले होते. या अहवालाच्या चार महिन्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा केल्याचा घोटाळा समोर आला होता. याच कंपनीतर्फे घाटी रुग्णालयात जवळपास २०२३-२४ मध्ये ३३ प्रकारच्या औषधींचा पुरवठा केला होता. अंबाजोगाईच्या घोटाळ्यानंतर औषध प्रशासनाकडून घाटीतील कंपनीच्या औषधांची तपासणी सुरू करण्यात आली. घाटीला २ कोटींची औषधी पुरविण्यासाठी विशाल एंटरप्रायजेसने निविदा भरली होती. ब्लॅक लिस्टमध्ये असताना कंपनीने पुरवठादाराने ब्लॅक लिस्ट नसल्याचे पत्र देऊन निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी मार्चमध्ये घेण्यात आले होते. ही औषधी बनावट असल्याचे तपासणीनंतर उघड झाले. जी औषधी बनावट म्हणून घोषित झाली, त्यातील १४ हजार ८७२ गोळ्या रुग्णांना वितरित झाल्या होत्या.

अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मनोज पैठणे यांनी बुधवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. विशाल एंटरप्रायजेसने घाटीला क्युरेक्सिम-२०० आणि सेफिक्झिम -२०० गोळ्या पुरवल्या होत्या. विशेष म्हणजे, केरळमध्ये स्कायक्युअर कंपनीच अस्तित्वात नसल्याचे केरळ औषध प्रशासनाने कळवले. यातील ‘काबीज’च्या विजय चौधरीला यापूर्वीच ठाण्यातील शांतीनगर पोलिसांकडून अटक झाली आहे.

असा झाला पुरवठा
विजय चौधरी बनावट औषधांची खरेदी करून ती मिहीर त्रिवेदींच्या जेनेरिकएज (ठाणे) यांना विक्री करत होता. त्याच्याकडून सुरेश पाटीलच्या विशाल एंटरप्रायजेसला विक्री होत होती. तर सुरेश या बनावट औषधींचा पुरवठा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला करत होता.

Web Title: Case registered against 'those' fake medicine suppliers of Kolhapur, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.