भाजीपाला विक्रेत्याच्या आत्महत्या प्रकरणी महावितरणाच्या अभियंता,कारकूनाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:57 PM2018-05-11T17:57:58+5:302018-05-11T19:08:00+5:30
भाजीपाला विक्रेत्याला ८ लाख रुपये ६५ हजाराचे वीज बील देऊन त्यास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी महावितरणचा संबंधित अभियंता आणि कारकुनाविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला.
औरंगाबाद : भाजीपाला विक्रेत्याला ८ लाख रुपये ६५ हजाराचे वीज बील देऊन त्यास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी महावितरणचा संबंधित अभियंता आणि कारकुनाविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर मृताचे घाटीत शवविच्छेदन करण्यात आले आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील भारतनगर येथील रहिवासी भाजीपाला विक्रेता जगन्नाथ नेहाजी शेळके यांनी ९ मे रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली. शेळके यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी घटनास्थळी मिळाली होती. या चिठ्ठीत त्यांनी स्वत: आत्महत्या करीत असल्याचे आणि महावितरणकडून खूप खूपच रिडींग आल्याचे नमूद केले होते.
आठ ते दहा दिवसांपूर्वी महावितरणकडून जगन्नाथ शेळके कुटुंबाला ८ लाख ६५ हजार २० रुपयांचे वीज बिल मिळाले. तेव्हापासून शेळके हे तणावाखाली होते. महावितरणच्या संबंधित अभियंता आणि कर्मचारीच शेळके यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप मृताची पत्नी भागीत्राबाई शेळके आणि भाऊ विठ्ठल शेळके यांनी केला होता. जोपर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद होत नाही,तोपर्यंत जगन्नाथ यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी गुरूवारी घेतली.
परिणामी पोलिसांना मृतदेह घाटीतील शितगृहात ठेवावा लागला. दरम्यान आज पुन्हा जगन्नाथ शेळके यांचे नातेवाईक आणि लोकप्रतिनिधी पुंडलिकनगर ठाण्यात जाऊन बसले. त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने पुंडलिकनगर पोलिसांनी याप्रकरणी भागित्राबाई यांची फिर्याद नोंदवून घेत महावितरणचा संबंधित अभियंता आणि कारकुनाविरोधात गुन्हा नोंदविला.
दोघे निलंबित
या प्रकरणी गारखेडा उपविभाग आज अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत आणि सहाय्यक लेखापाल हेमांगिनी मौर्य यांना महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी निलंबित केले.