पतसंस्थेच्या कॅशिअरने केला वीज बिलाच्या दोन लाख रुपयाचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:28 PM2018-01-25T18:28:49+5:302018-01-25T18:29:44+5:30
महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र असलेल्या एका पतसंस्थेच्या कॅशिअरने ग्राहकांकडून वीज बिलापोटी जमा केलेले तब्बल २ लाख १३ हजार २६७ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले.
औरंगाबाद : महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र असलेल्या एका पतसंस्थेच्या कॅशिअरने ग्राहकांकडून वीज बिलापोटी जमा केलेले तब्बल २ लाख १३ हजार २६७ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. २४ जानेवारी रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेच्या संचालकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
मुगेश लक्ष्मण जगताप असे अपहार करणार्या कॅशिअरचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सुलोचना दगडू आकसे (रा.न्यू एस.टी. कॉलनी) या जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक आहेत. पुंडलिकनगर रोडवरील त्यांच्या पतसंस्थेला महावितरणचे अधिकृत वीज बिल केंद्र दिलेले आहे. या केंद्रात शहरातील वीज ग्राहक बीलाची रक्कम जमा करतात. त्यानंतर पतसंस्थेकडून त्यांना अधिकृत पावती मिळते.
आरोपी मुगेश हा तक्रारदार यांच्या या वीज बिल भरणा केंद्रात कॅशिअर म्हणून नोकरीला आहे. २३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत त्याने वीज ग्राहकांकडून २ लाख १३ हजार २६७ रूपये जमा केले. यानंतर त्याने ही रक्कम तातडीने पतसंस्थेच्या कार्यालयात जमा केली नाही. उलट तो तेथून गायब झाला. रोख रक्कमेसह कॅशिअर गायब झाल्याचे तक्रारदार यांना कळाल्याने त्यांनी आणि अन्य कर्मचार्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र दुसर्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत तो न भेटल्याने शेवटी आकसे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे या गुन्ह्याचा तपास करीत आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक एल.ए.सिनगारे यांनी सांगितले.