जातीचे जोखड उतरवा

By Admin | Published: April 23, 2016 01:08 AM2016-04-23T01:08:51+5:302016-04-23T01:18:14+5:30

विजय सरवदे, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापुरुष तसेच राजकीय नेत्यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्याचे फॅड कमी होण्याचे नाव घेत नाही.

Cast off the race | जातीचे जोखड उतरवा

जातीचे जोखड उतरवा

googlenewsNext

विजय सरवदे, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापुरुष तसेच राजकीय नेत्यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्याचे फॅड कमी होण्याचे नाव घेत नाही. अगोदरच विद्यापीठात तब्बल १३ अध्यासने कार्यरत असताना त्यात आणखी नव्याने ५ केंद्रांची भर पडणार आहे. विशेष म्हणजे ज्या महापुरुषांच्या नावे अध्यासने आहेत, त्याच महापुरुषांच्या जातीच्या संचालकांची वर्णी अध्यासनावर लावण्यात आलेली आहे. जातीच्या जोखडातून ही अध्यासने मुक्त करावीत, अशी मागणी होत आहे. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणत्याच कुलगुरूंनी निर्णय घेतलेला नाही.
राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत व त्यांच्यावर संशोधन कार्य व्हावे, या हेतूने विद्यापीठ निधीतून विविध अध्यासनांची निर्मिती करण्यात आली आहे.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, गौतम बुद्ध, वसंतराव नाईक, बाळासाहेब पवार, शाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, ताराबाई शिंदे, शहीद भगतसिंग आणि ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, अशा १३ अध्यासनांचा समावेश आहे. या अध्यासनांचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी विद्यापीठ दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करते; पण संचालकांनी स्वत:चे मानधन उचलण्यापलीकडे ठळक असे कार्य केलेले दिसत नाही. केवळ संबंधित महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यापलीकडे अध्यासनांचे फारसे काम नाही.
मागील २५ वर्षांपूर्वीपासून महात्मा फुले अध्यासन केंद्र कार्यरत आहे. या केंद्राचे तेवढे भरीव योगदान राहिलेले आहे. पा. बा. सावंत हे या अध्यासन केंद्राचे संस्थापक संचालक होते. त्यानंतर प्रा. बा. ह. कल्याणकर यांनी या अध्यासन केंद्राची धुरा सांभाळली.
बा. ह. कल्याणकर व पा. बा. सावंत यांनी या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. त्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात वसंतराव नाईक व मौलाना आझाद अध्यासन केंद्र सोडले तर तब्बल ९ अध्यासन केंद्रांची विद्यापीठात भर पडली. अर्थसंकल्पात या अध्यासन केंद्रांसाठी प्रती वर्ष १ लाख रुपये याप्रमाणे पहिली पाच वर्षे तरतूद केली होती. म. फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, मौलाना आझाद आणि ताराबाई शिंदे या अध्यासन केंद्रांव्यतिरिक्त अन्य केंद्रांनी मात्र ना प्रबोधनाचे काम केले, ना संशोधनाचे.
कुलगुरूंसमोर चौकट मोडण्याचे आव्हान
विद्यमान कुलगुरू डॉ. बी. एच. चोपडे यांच्यासमोर अध्यासनांच्या संचालकांची फेररचना करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या महात्मा गांधी आणि शहीद भगतसिंग या दोन अध्यासनांना जातीचे संचालक सापडलेले नाहीत.
उर्वरित ११ अध्यासने मात्र, ज्या महापुरुषांच्या नावे आहेत, त्या अध्यासनावर संबंधित महापुरुषांच्या जातीचाच संचालक नेमण्यात आला आहे.
विद्यार्थी संघटना किंवा अन्य काही मार्गाने विद्यापीठाकडे मागणी आल्यामुळे नवीन अध्यासनांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये गोपीनाथ मुंडे सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट सेंटर, विलासराव देशमुख अध्यासन केंद्र, यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्र, उस्मानाबाद येथे विद्यापीठ उपकेंद्राच्या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील अध्यासन केंद्र, गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्रांचा समावेश आहे. यापैकी गोपीनाथ मुंडे यांच्या नावे सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासन केंद्रासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात ५ लाख रुपयांची तरतूदही करून ठेवली आहे.

Web Title: Cast off the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.