मोतीबिंदू शस्त्रकियेला 'कोरोना'ची लागण; शेकडो रुग्णांना काचबिंदू होण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 03:23 PM2020-08-24T15:23:25+5:302020-08-24T15:26:12+5:30
मोतीबिंदू ५० वर्षांवरील व्यक्तीत आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णाला अंधुक दिसते.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रकियेलाही कोरोनाची लागण झाली आहे. मार्चपासून या शस्त्रक्रिया ठप्प आहेत. परिणामी, शेकडो रुग्णांच्या मोतीबिंदूचे रूपांतर काचबिंदूत होऊन कायमची नजर जाण्याचा धोका नेत्र शल्यचिकित्सकांकडून व्यक्त होत आहे.
मोतीबिंदू ५० वर्षांवरील व्यक्तीत आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णाला अंधुक दिसते. मोतीबिंदू अधिक दिवस तसाच राहिला, तर त्याचे रूपांतर काचबिंदूत होते. त्यातून अधिक त्रास सहन करण्याची वेळ येते. दृष्टी जाण्याचीही भीती असते. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत असतात; परंतु राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसत आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे लक्ष्य आगामी कालावधीत अधिक शिबीर घेऊन पूर्ण केले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
एका जिल्ह्यात ३०० ते ५०० शस्त्रक्रिया
राज्यात एका जिल्ह्यात महिन्याला ३०० ते ५०० शस्त्रक्रिया होतात. एकट्या औरंगाबादेत जिल्हा रुग्णालयांतर्गत आमखास मैदानासमोरील नेत्र विभागात महिन्याला सुमारे २५० ते ३०० रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतात. मात्र, जिल्ह्यात मार्चपासून या शस्त्रक्रिया बंद आहेत. राज्यभरात हीच स्थिती आहे.
रोजच्या जेवणाची सोय नाही, तिथे शस्त्रक्रिया कशी करणार?
लक्ष्मीबाई पवार (पिंप्रीराजा औरंगाबाद) म्हणाल्या, तीन महिन्यांपासून चकरा मारत आहे. मोतीबिंदू आता पिकला आहे.
शंकर तोकडे म्हणाले, एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाली; पण दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया बाकी आहे.
राम जाधव म्हणाले, खाजगी रुग्णालयात २० हजार रुपये सांगितले. कोरोनामुळे दोन वेळच्या जेवणाची सोय होत नाही, तिथे या शस्त्रकियेसाठी इतके पैसे कुठून आणायचे.
खाजगीत लाखापर्यंत खर्च
खासगी रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी ५ हजारांपासून तर एक लाख रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागते. मात्र, राष्ट्रीय योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतात; परंतु सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया बंद आणि खाजगीत सुरू, अशी सध्या परिस्थिती असल्याचे शासकीय नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेने सांगितले.
शस्त्रक्रिया सुरू करा
राज्यात मार्चपासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या शासकीय रुग्णालयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी आम्ही केली आहे.
- डॉ. महेश वैष्णव, राज्य अध्यक्ष, शासकीय नेत्र चिकित्सा अधिकारी संघटना