पशुपालकांना आता चाऱ्याची चिंता; मोफत वैरण बियाणांसाठी अर्जाचा पाऊस

By विजय सरवदे | Published: September 22, 2023 02:34 PM2023-09-22T14:34:54+5:302023-09-22T14:35:35+5:30

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे पशुपालकांचे ८ हजार ६१० प्रस्ताव

Cattle breeders now worry about fodder; Rain of application for free Vairana seeds | पशुपालकांना आता चाऱ्याची चिंता; मोफत वैरण बियाणांसाठी अर्जाचा पाऊस

पशुपालकांना आता चाऱ्याची चिंता; मोफत वैरण बियाणांसाठी अर्जाचा पाऊस

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : पावसाने डोळे वटारल्यामुळे माळरान ओसाड पडले आहे. जनावरांना पावसाळ्यातच चारा नाही, तर हिवाळा आणि उन्हाळ्यात त्यांना खायला काय घालावे, या चिंतेत असलेल्या तब्बल ८ हजार ६१० पशुपालक शेतकऱ्यांनी वैरणीचे मोफत बियाणे मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात गर्दी केली आहे. यापूर्वी २ हजार ६९ पशुपालक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या योजनेंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना प्रतिलाभार्थी १५०० रुपये किमतीचे मका, न्युट्रीफिड बाजरी, नेपियर जातीच्या गवताची थोंबे वाटप केले जातात. अलीकडे प्राप्त ८ हजार ६१० प्रस्तावांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली असून तांत्रिक मान्यता मिळताच पशुपालकांना वैराणीच्या बियाणांचा पुरवठा केला जाईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र आणि पडीक जमिनीवर वैरणीच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान तत्त्वावर वैरणीच्या बियाणांचे वाटप केले जाते. आता खरीप हंगामातही वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान तत्त्वावर ही योजना राबविली जात आहे. पूर्वी उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी ही योजना राबवली जायची.

काय आहे राष्ट्रीय पशुधन अभियान?
राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर वैरणीचे उत्पादन घेता यावे, म्हणून राज्य शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर बियाणे वाटप केले जातात.

योजनेचे निकष काय?
लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदारांकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असावी. किमान ३ ते ५ जनावरे असावीत, जमीन पडीक, गवती कुरणक्षेत्र असावे.

पशुसंवर्धन अधिकारी म्हणतात..
पशुपालकांच्या हितासाठी ही योजना चांगली आहे. सन २०२३-२४ या वर्षात ८ हजार ६१० पशुपालक शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेस तांत्रिक मान्यता मिळताच वैरणीसाठी बियाणांचा पुरवठा आदेश देण्यात येईल.
- डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.

Web Title: Cattle breeders now worry about fodder; Rain of application for free Vairana seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.