गुरेढोरे, शेतजमिनीसह गोरेगाव तालुका विक्रीला; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला
By विजय पाटील | Published: January 8, 2024 01:55 PM2024-01-08T13:55:45+5:302024-01-08T13:56:22+5:30
शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीची भरपाई अथवा पिक विमा मिळाला नाही.
हिंगोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटत असून दुष्काळी मदत नाही, पिक विमा नाही, अशा परिस्थितीत कर्ज फेडता येत नाही त्यामुळे गोरेगाव अप्पर तहसील क्षेत्रातील गुराढोरांसह शेतजमिनी विकत घ्याव्या, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी अप्पर तालुका विक्रीला काढला आहे.
गोरेगाव अप्पर तहसीलमध्ये गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले की, यंदाच्या खरीप हंगामात आधी पाऊस न पडल्यामुळे तर नंतर अतिवृष्टीने नुकसान झाले. पुन्हा पिके ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिली. त्यामुळे सोयाबीनवर येलो मोजक रोग पडला. त्यानंतर कापसावर लाल्या रोग पडला. तर तुरीलाही गडद धुक्याने ग्रासले.
या भागातील प्रमुख पिकेच वाया गेली. पीक आणेवारी 50 टक्केच्या आत आहे. तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीची भरपाई अथवा पिक विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत शासन त्याचा गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे एक तर कर्जमाफी द्या अन्यथा गुराढोरांसह शेतजमिनी विकत घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.