चोरीच्या दुचाकीवर बनावट क्रमांक टाकणारा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:05 AM2021-07-11T04:05:11+5:302021-07-11T04:05:11+5:30
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एक जण चोरीच्या मोटारसायकलसह आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ९ जुलै ...
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एक जण चोरीच्या मोटारसायकलसह आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ९ जुलै रोजी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकासमोर संशयित दुचाकीस्वाराला अडविले. पोलिसांनी त्याचे नाव आणि दुचाकी कुणाच्या नावे आहे, याविषयी माहिती विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावल्याने त्याच्या दुचाकीच्या चेसीस क्रमांकाच्या आधारे आरटीओच्या नोंदणी क्रमांकाची माहिती घेतली. तेव्हा दुचाकीवरील क्रमांक बनावट असल्याचे त्यांना समजले. शिवाय ही मोटारसायकल पैठण येथून चोरी झाली होती, असे समोर आले. आरोपी फय्याज याने चोरीची दुचाकी पकडल्या जाऊ नये, याकरिता दुचाकीचा मूळ नोंदणी क्रमांक (एमएच-२० बीडी ६८३०) खोडून नंबर प्लेटवर त्याने एमएच २० बीएफ ९४८२ असा बनावट क्रमांक टाकल्याचे समोर आले. याविषयी पोलीस हवालदार गजानन मांटे यांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदविली. ही दुचाकी त्याने चोरली अथवा त्याने चोरट्याकडून विकत घेतली, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत आणि गुन्हे शोधपथक करीत आहेत.