कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाईचा टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:04 AM2021-06-11T04:04:02+5:302021-06-11T04:04:02+5:30
फुलंब्री : सिल्लोड येथून औरंगाबादकडे कत्तलीसाठी गाई घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर महामार्ग पोलिसांनी चौका घाटात कारवाई केली आहे. तर दोन ...
फुलंब्री : सिल्लोड येथून औरंगाबादकडे कत्तलीसाठी गाई घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर महामार्ग पोलिसांनी चौका घाटात कारवाई केली आहे. तर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई महामार्ग सुरक्षा दलाच्या पोलिसांनी केली.
महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस चौका घाटाच्या नजीक वाहनाची तपासणी करीत होते. सिल्लोडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पोला (क्र. एमएच २० ई एल १२२०) पोलिसांनी अडवून तपासणी केली. तेव्हा दोरीने बांधून कोंबून भरलेल्या पाच गाई आढळून आल्या. दरम्यान, चालक घटनास्थळावरून पळून जाण्यास यशस्वी झाला. तर गाडीतील अन्य एका व्यक्तीकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथून औरंगाबादेतील कत्तलखान्यात गाई नेल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.
---
फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी जमादार जनार्धन राठोड यांच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात फरार झालेला टेम्पो चालक व अन्य शेख फेरोज शेख अली (रा. बोरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कारवाईतील पाचही गाई गव्हाली येथील गौशाळेकडे सुपूर्द करण्यात आल्या. तर पाच गाई, टेम्पोसह ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई महामार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस निरीक्षक नंदिनी चंदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, जमादार जनार्धन राठोड, सुनील काकड, नंदेश्वर पोटुळे यांनी ही कारवाई केली.