विद्यापीठास खंडपीठाची कारणेदर्शक नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:02 AM2021-08-01T04:02:27+5:302021-08-01T04:02:27+5:30
औरंगाबाद : इंग्रजी विषयात ‘पीएच.डी.’साठी प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी दाखल याचिकेच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बामु) ...
औरंगाबाद : इंग्रजी विषयात ‘पीएच.डी.’साठी प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी दाखल याचिकेच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बामु) व विद्यापीठ अनुदान आयोगास कारणेदर्शक नोटिसा बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांनी दिला आहे.
संशोधक चंद्रशेखर भाऊराव जाधव यांनी ॲड. शिरीष कांबळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर ९ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ता चंद्रशेखर जाधव यांनी २०१४ ला इंग्रजी विषयाची ‘पेट’ दिली होती. परीक्षेत ते ‘एसबीसी’, ‘एसटी’ आणि ‘ओबीसी’च्या राहिलेल्या जागांवर गुणवत्ता यादीत आले होते. २०१५ ला गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तत्कालीन विद्यापीठ नियमाप्रमाणे गुणवत्ता यादीमध्ये असलेल्या संशोधकांसाठी मार्गदर्शक देत होते. पण, विद्यापीठाने जाधव यांना संशोधन मार्गदर्शक उपलब्ध करून दिले नाहीत. याचिकाकर्त्याने मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावे म्हणून पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांना मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. मार्गदर्शक उपलब्ध करून त्यांचे संमतीपत्र सोबत पीएच.डी.साठी नोंदणी करून, तसे तात्पुरते प्रमाणपत्र द्यावे, यासाठी त्यांनी विद्यापीठास दोन वेळा अर्ज केला. १३ जुलै २०२१ ला त्यांनी शेवटचा अर्ज केला, तरीही विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक आणि प्रवेशपत्र दिले नाही. यामुळे त्यांनी याचिका दाखल केली आहे.