सावधान...भेसळयुक्त खवा, पनीर खाल्ल्यास होऊ शकतो पोटाचा त्रास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 02:54 PM2021-10-31T14:54:35+5:302021-10-31T14:55:01+5:30

परराज्यातून येणारा खवा, पनीरवर एफडीएची नजर

Caution ... Eating adulterated khova, paneer can cause stomach upset! | सावधान...भेसळयुक्त खवा, पनीर खाल्ल्यास होऊ शकतो पोटाचा त्रास !

सावधान...भेसळयुक्त खवा, पनीर खाल्ल्यास होऊ शकतो पोटाचा त्रास !

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : दिवाळीत खवा, पनीरची मागणी वाढते. याचा गैरफायदा घेत भेसळीचे खवा, पनीर अन्य दुग्धजन्य पदार्थांचा बाजारपेठेत पुरवठा केला जातो. यामुळे या काळात ग्राहकांनी अतिजागरूक राहणे गरजेचे आहे. भेसळयुक्त खवा, पनीर खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो.

जास्त पैसे घ्या, पण शुद्ध खवा, पनीर द्या, असे ग्राहक स्वत:हून विक्रेत्यांना म्हणताना दिसत आहेत. दरवर्षी दिवाळीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून भेसळयुक्त खवा, पनीर अन्य पदार्थ बाजारात येतात. खराब पोत्यांमध्ये खवा आणला जातो. अन्न व औषध प्रशासन या काळात मिठाईच्या दुकानात तपासणी करतात. जप्ती, कारवाई होते, कायदेही कडक आहेत. ग्राहकांनी सावध राहून मिठाई खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

घरच्या घरी ओळखा भेसळ
१) खव्यातील भेसळ : खव्यामध्ये स्टार्च मिसळलेला असतो. थोडा खवा घेऊन तो पाण्यात उकळावा. त्यानंतर थंड करा. त्यात आयोडिनचे थेंब टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्च मिसळला आहे, (पिठूळ पदार्थ) असे समजावे.
२) पनीरमध्ये भेसळ : पनीरमध्येही कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. त्याची तपासणी खव्याप्रमाणेच घरी करता येते.
३) शुद्ध तुपात भेसळ : एक चमचाभर तूप घेऊन ते गरम करावे. एका छोट्या वाटीत हा नमुना घेऊन त्यावर तेवढेच हायड्रोक्लोरिक आम्ल ओता आणि त्यातच एक चिमूटभर साखर टाका. हे मिश्रण थोडे हलवा आणि ५ मिनिटे स्थिर ठेवा. या मिश्रणात खालच्या बाजूला नारिंगी थर दिसल्यास वनस्पती तुपाची भेसळ आहे असे समजा.

३३९ किलो मिठाई, ३५८ किलो खवा जप्त
जिल्ह्यात मागील काही दिवसात भेसळीच्या संशयावरून १४ दुकानांतून ३३९ किलो मिठाई जप्त करून तपासणीसाठी अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आली. तसेच एका दुकानातून खवा जप्त करण्यात आला. सात दुकानांतून ३५८ किलोग्रॅम खाद्यतेल जप्त केले.

कारवाई सुरू
दरवर्षी दसरा-दिवाळीत भेसळीचा खवा, पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थ विक्रीला येतात. अन्न निरीक्षक दुकानात जाऊन पदार्थांची तपासणी करतात. तसेच परराज्यातून खासगी ट्रॅव्हल्समधून येणाऱ्या मिठाई व कच्च्या मालावर आमची नजर आहे. शहरातील काही दुकानातून मिठाई व खव्वा, खाद्यतेलाचे नमुने घेऊन ते तपासणीला पाठविले आहे. आमची कारवाई चालूच आहे.
- अजित मैत्रे, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन

Web Title: Caution ... Eating adulterated khova, paneer can cause stomach upset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.