सावधान ! चोरीची गाडी वापरल्यास माफीचा साक्षीदार नव्हे जावे लागेल तुरुंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 03:17 PM2021-08-03T15:17:03+5:302021-08-03T15:20:51+5:30
शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकींपैकी ५ टक्के दुचाकी शहरातच विकण्यात येतात.
- राम शिनगारे
औरंगाबाद : चोरीची दुचाकी विकत घेतल्यास आता महागात पडणार आहे. गाडी पकडल्यानंतर पोलिसांकडे कागदपत्रे सादर करता आली नाही किंवा पकडलेली गाडी चोरीची निघाली, तर थेट गाडी विकत घेणाऱ्या व्यक्तीस आरोपी बनवून त्याला तुरुंगाची वारी घडविण्यात येत आहे. मागील सात महिन्यांत शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत तब्बल ७१ जणांना आरोपी बनविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. दररोज चार- पाच दुचाकी चाेरीच्या घटना उघडकीस येत आहेत. प्रत्येक ठिकाणी दुचाकी चोरण्याच्या घटना आणि पद्धत एकसारखीच असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकींपैकी ५ टक्के दुचाकी शहरातच विकण्यात येतात. १० किलोमीटर अंतरात ५ टक्के आणि ५० किलोमीटरच्या परिसरात चोरीला गेलेल्या दुचाकींपैकी ५० टक्के दुचाकी विकण्यात येत असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच १०० किलोमीटर अंतरामध्ये उर्वरित ५० दुचाकी विकण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मागील सहा महिन्यांपासून रस्त्यावर एखाद्या दुचाकी चालकाला पकडल्यास त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते. एवढेच नाही तर कार इन्फो, व्हेईकल इन्फो या ॲपवर गाडीचा नंबर टाकून सर्व माहिती गोळा केली जाते. संबंधित गाडीचालकाने दिलेली माहिती ॲपवरील माहितीशी जुळत नसल्यास चालकाला पकडले जाते. पकडलेली गाडी चोरीची निघाल्यास विकत घेणाऱ्यास आरोपी बनविण्याची मोहीमही सध्या सुरु आहे.
गावागावात पोलीस जाणार
शहरातून चोरी होणाऱ्या दुचाकी गाड्यांची विक्री ग्रामीण भागात करण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात जाऊन शहरातील पोलिसांकडून चोरीच्या गाड्या पकडण्याची माेहीम राबविली जाणार आहे. चोरीची गाडी घेणारा एकजण जरी सापडला तर गाड्या चोरणाऱ्यांचे एक रॅकेट उघडकीस येऊ शकते. त्यादृष्टीने औरंगाबाद पोलीस तयारी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
मशीनच सांगते चोरीची गाडी
शहर वाहतूक पोलिसांकडे दंडाचे चलन भरण्यासाठी मशीन आलेल्या आहेत. या मशीनवर गाडीच्या क्रमांकासह इतर माहिती टाकताच ती गाडी चोरीची आहे की नाही हा अलर्ट मिळतो. चोरी झालेल्या गाड्यांचा क्रमांक, चेसीस नंबरसह इतर माहिती मशीनमध्ये आहे. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या चोरीच्या गाड्या आता मोठ्या प्रमाणात पकडल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी चोरीची गाडी विकत घेऊ नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे.