मुलींच्या शिक्षणासाठी सजगतेची गरज
By Admin | Published: June 16, 2016 11:46 PM2016-06-16T23:46:37+5:302016-06-17T00:34:27+5:30
बीड : मुलींच्या शिक्षणाचा अर्थ केवळ प्रवेश घेणे व थेट परीक्षेला येणे एवढाच नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लग्न होईपर्यंत डिग्री मिळते म्हणून प्रवेश घेणे थांबले पाहिजे
बीड : मुलींच्या शिक्षणाचा अर्थ केवळ प्रवेश घेणे व थेट परीक्षेला येणे एवढाच नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लग्न होईपर्यंत डिग्री मिळते म्हणून प्रवेश घेणे थांबले पाहिजे. यासाठी पालकांनी सजग राहावे लागेल. याशिवाय विद्यापीठ स्तरावरून अभ्यासक्रम बनविताना ‘जॉब ओरिएंटेड’ अभ्यासक्रम बनविणे आवश्यक आहे, असे मत महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता शेटे यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाबाबत आशादायी चित्र निर्माण करण्यासाठी ज्या बाबी अडसर ठरत आहेत, त्यावर डोळसपणे प्रकाश टाकून तो अडसर दूर करण्यासाठी पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी समोर आले पाहिजे, असे सांगत प्राचार्या शेटे म्हणाल्या की, आर्ट, कॉमर्स, सायन्स या अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थिनींचा लोंढा अधिक आहे; मात्र प्रत्यक्षात फलनिष्पत्ती म्हणावी तशी दिसून येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २१ व्या शतकात आम्ही पुरोगामी, महिला सबलीकरणाच्या गप्पा मारत असलो तरी, प्रत्यक्षात वस्तुस्थिती प्रचंड बिकट आहे. परिस्थिती बिकट आहे, याचा अर्थ असा नाही, की ती बदलता येणार नाही. परिस्थिती बदलेल; मात्र त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. परदेशातल्या प्रमाणे सीबीसीएस (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम) आजच्या शिक्षण पद्धतीत लागू करणे अनिवार्य झाले आहे. ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याला त्या विषयात अभ्यास करता आला पाहिजे. तेव्हाच गुणवत्तेचा आलेख उंचावणार आहे. जिल्ह्यात केवळ मुलींना शिक्षण देणारे सहा ते सात महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधील मुलींची उपस्थिती कमी प्रमाणात आहे. यूजीसी, विद्यापीठ, महाविद्यालये, विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम राबविते; मात्र हे कार्यक्रम ज्यांच्यासाठी, त्यांचीच उपस्थिती नसेल तर हा उपद्व्याप कशासाठी आणि कोणासाठी, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)