औरंगाबादमध्ये सीबीआयची कारवाई; लाचेच्या रकमेचा चेक घेताना बँकेचा वसुली एजंट ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 07:44 PM2021-06-10T19:44:27+5:302021-06-10T19:46:02+5:30
तक्रारदाराने मंडप डेकोरेशनच्या व्यवसायासाठी पंतप्रधान स्वयरोजगार योजेनेनतर्गत १० लाख रुपये कर्ज मिळविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे २०१८ मध्ये फाईल दाखल केली होती
औरंगाबाद: मंजूर दहा लाख रुपये कर्ज खात्यात जमा करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन ८० हजाराचे धनादेश घेणाऱ्या बॅंकेच्या वसुली एजंटला केंद्रीय गुन्हे अन्वेशन ब्यूरो (सीबीआय) ने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. वसुली एजंटला लाचेच्या ८० हजार रुपयांचे दोन बेअरर धनादेश घेताना ५ जून रोजी सीबीआयने अटक केली. सुरेश भालेराव असे आरोपीचे नाव आहे. येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन दिवस सीबीआय कोठडी ठोठावली होती.
याविषयी सीबीआयच्या वरिष्ठ सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मंडप डेकोरेशनच्या व्यवसायासाठी पंतप्रधान स्वयरोजगार योजेनेनतर्गत १० लाख रुपये कर्ज मिळविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे २०१८ मध्ये फाईल दाखल केली होती. त्यांची फाईल पुढील कार्यवाहीसाठी शहरातील पैठणगेट येथे युनियन बॅंकेची शाखेकडे गेल्याचे गतवर्षी जानेवारी २०२० मध्ये समजले होते. तेव्हापासून ते बॅंकेत चकरा मारत होते. मात्र त्यांच्या फाईलविषयी कोणीही त्यांना समाधानकारक माहिती त्यांना देत नव्हते. दरम्यान एके दिवशी ते बॅंकेतून बाहेर पडले तेव्हा बॅंकेचा अधिकृत वसुली एजंट भालेराव भेटला. त्याने तुझी कर्जाची फाईल बॅंकेचे व्यवस्थापक जयप्रकाश झा यांच्या टेबलवर आहे. त्यांना खूश केल्यावर तुला तुझ्या कर्जाच्रे रक्कम मिळेल.
यानंतर भालेराव हे त्याला घेऊन एका बिअर बार मध्ये गेले. तेथे त्यांनी त्याला तुला मिळणाऱ्या सबसिडीची अडीज लाखाची रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल असे सांगितले. फाईलमधील सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे असे असतांना तुम्हाला एवढी रक्कम कशासाठी देऊ असा सवाल तक्रारदाराने केला. यावेळी भालेरावने त्यांना पैसे दिले नाही तर कर्ज मिळणार नाही असे सांगितले. तेव्हा तडजोड करून तक्रारदार यांनी एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. यावेळी झा तेथे उपस्थित होते. दुसऱ्या महिन्यात दहा लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे त्यांना समजले. मात्र, ही रक्कम तक्रारादार यांच्या खात्यात जमा केली जात नव्हती.
लाचेला होकार देताच खात्यात वर्ग केले पाच लाख
तक्रारदार यांनी नाईलाजाने त्यांना लाच देण्याची तयारी दर्शविली. यानंतर जानेवारी महिन्यात दहा लाख रुपयापैकी पाच लाख रुपये तक्रारदाराच्या खात्यात वर्ग केली. तेव्हापासून आरोपी भालेराव हा सारखे लाचेच्या एक लाखासाठी तगादा लावत होता. मात्र, तक्रारदार हे टाळाटाळ करीत होते. लाच न दिल्याने उर्वरित कर्ज आरोपीनी रोखून धरले होते. याविषयी त्यांनी २ जून रोजी सीबीआयकडे झा आणि भालेरावची तक्रार केली.
लाचेच्या स्वरूपात घेतले बेअरर धनादेश
तक्रार प्राप्त होताच सीबीआय चे निरीक्षक मुकेश प्रचंड आणि कर्मचाऱ्यांनी ५ जून रोजी पैठणगेट येथील बॅंकेच्या समोर सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्याकडे रोख रक्कम नसल्याचे आरोपीना सांगितले असता आरोपी भालेराव ने त्यांना ५० हजार रुपये आणि ३० हजार रुपये असे वेगवेगळ्या रकमेचे बेअरर धनादेश देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून धनादेश घेताच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भालेरावला रंगेहाथ पकडले.