ई-कॉमर्स कंपन्यांच्या कारभाराची सीबीआय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:02+5:302021-09-24T04:06:02+5:30
औरंगाबाद : ई-कॉमर्स कंपन्या सर्व नियम व कायदे पायदळी तुडवत देशात मोठ्या प्रमाणात व्यापार करीत आहेत. या ई-कॉमर्स कंपन्यांच्या ...
औरंगाबाद : ई-कॉमर्स कंपन्या सर्व नियम व कायदे पायदळी तुडवत देशात मोठ्या प्रमाणात व्यापार करीत आहेत. या ई-कॉमर्स कंपन्यांच्या कारभाराची सीबीआय चौकशी करा, मोठा घोटाळा समोर येईल, असा आरोप करीत जिल्हा व्यापारी महासंघाने गुरुवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविले.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संलग्न संघटना जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी ई-कॉमर्स कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया व महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात देशभरात १५ सप्टेंबरपासून आंदोलन छेडण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहे. याअंतर्गत देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ई-कॉमर्स कंपन्या कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. याकडे केंद्र सरकार व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना कैटचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शहा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, विजय जैस्वाल, सरदार हरिसिंग, जयंत देवळाणकर, गुलाम हक्कानी, संजय संघवी, लक्ष्मण सावनानी आदींची उपस्थिती होती.