सीबीएसईच्या निर्णयाचे तज्ज्ञांकडून स्वागत, पालक-विद्यार्थ्यांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:05 AM2021-06-03T04:05:42+5:302021-06-03T04:05:42+5:30

--- औरंगाबाद : सीबीएसईच्या दहावीपाठोपाठ आता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याचे शाळा, शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांतून स्वागत ...

CBSE decision welcomed by experts, confusion among parents-students | सीबीएसईच्या निर्णयाचे तज्ज्ञांकडून स्वागत, पालक-विद्यार्थ्यांत संभ्रम

सीबीएसईच्या निर्णयाचे तज्ज्ञांकडून स्वागत, पालक-विद्यार्थ्यांत संभ्रम

googlenewsNext

---

औरंगाबाद : सीबीएसईच्या दहावीपाठोपाठ आता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याचे शाळा, शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांतून स्वागत होत असताना विद्यार्थी, पालकांत ‘थोडी खुशी, थोडा गम’ची स्थिती आहे. याच धर्तीवर राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचाही निर्णय व्हावा. मात्र, केवळ बारावीचे अंतर्गत मूल्यांकन न होता दहावी आणि अकरावीच्या गुणांचाही विचार व्हावा असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी खूप मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांतून काहीसा नाराजीचा सूर असताना राज्य मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय निर्णय होतो याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

--

मुलांच्या आरोग्याचा विचार करता सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. मुलांचे अंतर्गत मूल्यमापन होईल. ५ सराव परीक्षा, गृहपाठ, प्रकल्प सादरीकरण यावरून गुणदान केले जाणार आहे. मात्र, यात पालक, विद्यार्थ्यांत दुजाभाव होऊ नये अशी अपेक्षा आहे. गुणदान निष्पक्षपणे झाले पाहिजे. राज्य मंडळाच्याही परीक्षा रद्द होऊन दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार, तसेच यावर्षीचे अंतर्गत मूल्यमापन त्यात व्हावे. कारण सीबीएसईच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचलेले नाही, तसेच आपत्कालीन परिस्थितीमुळे शून्य शैक्षणिक वर्षाचाही विचार झाला पाहिजे.

-एस. पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

--

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. मुलांच्या जिवापेक्षा मोठे काही नाही. शिक्षण नंतरही घेता येईल. सीबीएसई शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार केले होते. अंतर्गत परीक्षा घेतलेल्या आहेत. विद्यार्थी शाळेत येऊनही शिकले. त्यामुळे प्रामाणिक गुणांकन करून सीबीएसईला देता येणे शक्य आहे. खूप जीव तोडून मेहनत केलेल्या, अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळालेले शिक्षण परीक्षा झाली नसली तरी ते जीवनात उपयोगी पडेल. ते वाया जाणार नाही याबद्दल समजावणेही तितकेच गरजेचे आहे.

-समृद्धी भुसेकर, प्रशासकीय अधिकारी, पीएसबीए शाळा

---

बारावीसाठी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून तयारी करीत आहे. सुरुवातीला प्रत्यक्ष वर्ग, नंतर ऑनलाइन, त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग, पुन्हा ऑनलाइन शिकले. सर्व तयारी केली, आता परीक्षा होणार नसल्याने वाईट वाटते. दहावीत, अकरावीत मार्क कमी होते; पण यावर्षी जास्त अभ्यास करून चांगले गुण मिळवायचा प्रयत्न होता; पण आता पुढे काय होईल याबद्दल चिंता वाटते.

-प्रज्ञा शिंदे, बारावी- विद्यार्थिनी

---

मुलांची काळजी आहे; पण परीक्षा रद्द व्हायला नको होती. उच्च शिक्षणात या विद्यार्थ्यांना अडचणी येतील याची चिंता वाटते. कोरोनाचे सावट दूर झाल्यावर परीक्षा घेता आल्या असत्या; पण आता पुढच्या सीईटी, नीट या परीक्षा लवकर व्हायला पाहिजे.

-शिवराम खेडकर, पालक

---

६३,२१५

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी

---

जिल्ह्यातील बोर्डनिहाय बारावीचे विद्यार्थी

---

बोर्ड : शाळा/महाविद्यालय : विद्यार्थी

--

सीबीएसई ः २१ ः ४७१

आयसीएसई ः १ ः ००

इंटरनॅशनल ः १ ः १२

राज्य मंडळ ः ५५१ ः ६२,७३२

----

Web Title: CBSE decision welcomed by experts, confusion among parents-students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.