'सीबीएसई' परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी
By विजय सरवदे | Published: May 12, 2023 05:57 PM2023-05-12T17:57:20+5:302023-05-12T17:57:25+5:30
९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत देखील ३० हजारांहून अधिक घट झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी १२ मे रोजी ऑनलाइन जाहीर झाला आहे. यंदाच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. 'सीबीएसई' पुणे विभागाचा निकाल ८७.२८ टक्के लागला आहे.
१५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. या निकालाचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९०.६८ टक्के मुली, तर ८४.६७ टक्के मुलं पास झाली आहेत. उत्तीर्ण मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा ६ टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात ५.३८ टक्क्यांची घसरण झाली आहे.९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत देखील ३० हजारांहून अधिक घट झाली आहे.