सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना जुने पुस्तक चालत नाही का? पालकांच्या खिशाला कात्री
By विजय सरवदे | Published: May 11, 2023 12:17 PM2023-05-11T12:17:20+5:302023-05-11T12:17:46+5:30
शाळा- शाळांमधील स्पर्धेतून दरवर्षी काही शाळा सुधारित कंटेंट असलेली खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांबाबत आग्रही असतात. त्याचा भूर्दंड पालकांना बसतो.
छत्रपती संभाजीनगर : हल्ली आपल्याकडे ''सीबीएसई'' शाळांचे मोठ्या प्रमाणात फैड वाढत चालले आहे. सर्वसामान्य पालकांनाही आपली मुले ''सीबीएसई'' शाळेतच शिकली पाहिजेत, असे वाटते. मात्र, दरवर्षी पुस्तकात फारसा बदल नसतानाही या शाळा मुलांकडे नवीन पुस्तकांसाठी आग्रह धरतात. त्यामुळे पालकांना विनाकारण मोठ्या खर्चाला सामोरे जावे लगत आहे.
प्रामुख्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ''सीबीएसई'' मान्यताप्राप्त शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) या प्रकाशन संस्थेच्या पाठ्यपुस्तकांचाच अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र, शाळा- शाळांमधील स्पर्धेतून दरवर्षी काही शाळा सुधारित कंटेंट असलेली खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांबाबत आग्रही असतात. त्याचा भूर्दंड पालकांना बसतो.
दरवर्षी नवीन पुस्तकांचा आग्रह
शहर व परिसरातील काही ''सीबीएसई'' शाळा दिलेल्या यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदी करण्यासाठी आग्रह करतात.
अभ्यासक्रम तोच, मग पुस्तक नवे कशासाठी?
अजून नवीन शैक्षणिक धोरणानुसार बाजारात बदल झालेली नवीन पुस्तके आलेली नाहीत किंवा या धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवातही झालेली नाही. तरीही नवीन पुस्तकांसाठी शाळांचा आग्रह का, हे पालकांना पडलेला प्रश्न आहे.
नवीन पुस्तकांची लाखोंची उलाढाल
एकिकडे ''एनसीईआरटी''ची पुस्तके स्वस्त आहेत. पण, खाजगी प्रकाशनाचे एकेक पुस्तक ३०० ते ४०० रुपयांच्या घरात आहे. यामुळे बाजारात दरवर्षी लाखोंची उलाढाल होते.
यंदा सीबीएसईची कोणती पुस्तके बदलली?
यंदा ''सीबीएसईची''ची पुस्तके बदलली नाहीत. मात्र, स्पर्धक शाळेपेक्षा आपल्या शाळेतील मुले जगाच्या स्पर्धेत यशस्वी व्हावीत, या हेतूने सुधारित कंटेंट असलेली खाजगी प्रकाशनाची पुस्तके अभ्यासासाठी वापरण्याकडे शाळांचा कल वाढला आहे. यातूनच मुलांकडे नवीन पुस्तकांसाठी आग्रह धरला जातो.
- सतीष तुपे, शिक्षणतज्ज्ञ
मुलांच्या आग्रहास्तव
नवीन वर्गात जाताना मुलालाही नवीन पुस्तकांची ओढ असते. शाळाही निकाल जाहीर करताना पुस्तकांची यादी देतात. अशावेळी मुलांच्या आग्रहास्तव पुस्तके घ्यावीच लागतात.
- अभ्युदय घुले, पालक
शाळा सांगतात
शाळेचे दरवर्षी भरमसाठ शुल्क भरताना नाकीनऊ येते. त्यात या नवीन पुस्तकांचा खर्च. घरातील थोरल्या मुलाची पुस्तके असतानाही शाळेने सांगितले म्हणून धाकट्यासाठी नाईलाजाने नवीन पुस्तके खरेदी करावी लागतात.
- शिरीष जाधव, पालक