सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By Admin | Published: June 22, 2014 11:10 PM2014-06-22T23:10:13+5:302014-06-23T00:25:23+5:30

भूम : मोठा गाजावजा करुन भूम शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी व कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.

CCTV cameras closed | सीसीटीव्ही कॅमेरे बंद

सीसीटीव्ही कॅमेरे बंद

googlenewsNext

भूम : मोठा गाजावजा करुन भूम शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी व कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र, भूमकरांना याबाबतीत ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे. हे कॅमेरे मागील तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत. परिणामी यावर प्रशासनाने केलेला लाखो रूपयांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला आहे.
वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, चोरांचा सुळसुळाट, महिलांच्या छेडछाडी आदी घटना डोळ्यासमोर ठेवून शहरातील बसस्थानक परिसर, गोलाई चौक, तहसील कार्यालय परिसर, पार्डी रोड या ठिकाणी तब्बल १ लाख ८० हजार रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सुरुवातीचे काही दिवस हे कॅमेरे सुस्थितीत चालले. त्यामुळे गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांना बऱ्यापैकी आळाही बसला होता. मात्र मागील तीन महिन्यांपासून हे कॅमेरे बंद पडले असून, त्याच्या दुरूस्तीकडे अद्याप कुणीच लक्ष दिलेले नाही. परिणामी कॅमेरे बसविण्यावर झालेला पावणेदोन लाखावरचा खर्च सध्यातरी वायाच गेला असे म्हणावे लागेल. (वार्ताहर)
ना पुढाऱ्यांना सोयरसुतक.. ना पोलिसांना...
एकीकडे गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे केलेल्या उपाययोजनांकडे सपशेल कानाडोळा केला जात आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे सीसीटीव्हीच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष. लाखो रुपये खर्च करुन निर्माण करण्यात आलेली ही सुविधा आज अडगळीला पडली आहे. याचे ना पुढाऱ्यांना ना पोलिसांना सोयरसुतक आहे.
शहरामध्ये सातत्याने वर्दळ असते. ग्रामीण भागातून शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्याही जास्त आहे. या संधीचा फायदा घेत, महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे बंद पडलेले कॅमेरे सुरु करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मागील तीन महिन्यांपासून कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे या परिसरात घडणाऱ्या घटनांचा तपास लावण्यात अडचणी येत असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पेमेंट थकल्याचे कारण
ज्या कंत्राटदारांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले याची काही रक्कम थकित आहे. त्यामुळे सदरील सीसीटीव्ही दुरुस्ती केली जात नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या सीसीटीव्हीची दुरुस्ती करण्याऐवजी सर्व वायर गुंडाळून स्ट्रीट लाईटच्या खांबावर लटकविण्यात आले आहेत.

Web Title: CCTV cameras closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.