पाण्यासाठी सिडकोचे अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:27 PM2019-03-28T22:27:50+5:302019-03-28T22:28:04+5:30
पाणी प्रश्नावर सिडको वाळूज कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत संतप्त नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
वाळूज महानगर: पाणी प्रश्नावर सिडको वाळूज कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत संतप्त नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
सिडको वाळूज महानगर १ व २ मधील अनेक नागरी वसाहतींना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. आठवड्यातून दोनवेळा तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही वसाहतींना मागणीनंतरही प्रशासनाकडून नळजोडणी दिली जात नाही. त्यामुळे रहिवाशांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे म्हाडा कॉलनी, राज स्वप्नपूर्ती, फुलोरा, सारा व्यंकटेश, स्रेहवाटिका, सिद्धीविनायक विहार, ग्रोथ सेंटर आदी भागांतील नागरिकांमधून प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला जात आहे. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेवून सिडको प्रशासनातर्फे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सिडको वाळूज कार्यालयात बैठक घेण्यात आली.
यात नागरिकांनी पाणी प्रश्नाबरोबरच इतर नागरी समस्यांचा पाढा वाचला. किमान पाणी तरी द्या, अशी मागणी केली. बैठकीला नागेश कुठारे, प्रभाकर धोत्रे, रामेश भांबरे, राम शिंदे, दादा मिसाळ, दीपक भुतेकर, विजय कसबे, आबाजी गाणार, सुशिल सावंत, विकास रहाणे, संदीप रोडे, सुधाकर भिसे, संकेत डुंबरे, सरोज बावीस्कर, नयना पवार, कल्पना पवार, अर्चना औताडे, सुजाता रहाणे, रत्ना गायके, वंदना शिंदे, विजया पाटील आदींसह शंभरपेक्षा अधिक महिला-पुरुषांची उपस्थिती होती.
अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
सिडकोचे अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे व उप अभियंता दीपक हिवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत नागरिकांनी म्हाडा कॉलनी, राज स्वप्नपुर्ती, फुलोरा, सारा व्यंकटेश, स्रेहवाटिका, सिद्धीविनायक विहार, ग्रोथ सेंटर आदी नागरी वसाहतींना कमी दाबाने पाणी मिळत असल्याची तक्रार मांडली. तसेच सिडकोच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत नागरी समस्यांचा पाढाच वाचला. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी महानगर १ व २ मध्ये नवीन दोन जलकुंभ उभारावेत, अशी मागणी करण्यात आली.