चैत्रात वैशाख वणवा! मराठवाड्यात उष्णतेची लाट, छत्रपती संभाजीनगरचा पारा ४२ डिग्री पार
By विकास राऊत | Published: April 19, 2024 11:28 AM2024-04-19T11:28:26+5:302024-04-19T11:29:09+5:30
काळजी घ्या, २४ एप्रिलपर्यंत तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात तापमानात वाढ झाल्यामुळे चैत्रात वैशाखासारख्या उन्हाचा चटका जाणवला. उष्णतेची लाट आल्यामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा चढला. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस होते. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदविले गेले. त्याखालोखाल बीड ४१.६, जालना ४१, नांदेड ४१, लातूर ४१, धाराशिवमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
२४ एप्रिलपर्यंत तापमान वाढीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यात तापमान वाढू लागले आहे. सूर्य अक्षरश: आग ओकत असून उष्ण वातावरणामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य होते. ९ ते १६ एप्रिलदरम्यान मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मागील सात दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा जिरायती, बागायती, फळबागांना बसला. सुमारे ४८१ गावांतील ९ हजार १२७ शेतकऱ्यांच्या ५,२५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १० जणांचा वीज पडून मृत्यू तर १० जण जखमी झाले. त्यानंतर आता उष्णता वाढली आहे. १२०० टँकरने मराठवाड्यात पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगला असेल, असे भाकीत हवामानतज्ज्ञ करीत आहेत.
मराठवाड्यातील जिल्हानिहाय तापमान
(कमाल तापमान)
छत्रपती संभाजीनगर : ४२.२
बीड : ४१.६
जालना : ४१
परभणी : ४०.५
हिंगोली : ४०
नांदेड : ४१
लातूर : ४१
धाराशिव : ४१