नेत्यांची जुगलबंदी, प्रशासनाची कोंडी; गणेशोत्सव शिस्तीत, उत्साहात साजरा करण्याचा निर्धार!
By योगेश पायघन | Published: August 28, 2022 10:47 AM2022-08-28T10:47:14+5:302022-08-28T10:48:14+5:30
Aurangabad : पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संत एकनाथ रंगमंदिरात शनिवारी पार पडली.
औरंगाबाद : गणेशोत्सव निर्बंधमुक्त, शिस्तीत उत्साहात साजरा करण्यासाठी आयोजित शांतता समिती बैठक समन्वय बैठक म्हणून घेण्यात आली. मात्र नेत्यांच्या मानापमान नाट्यात प्रशासनाची कोंडी झाली. कोपरखळ्यांनी एकच हशा पिकला. अडचणी सांगा, २४ तासांत सोडवू, गणेशोत्सव शिस्तीत, आनंदात पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संत एकनाथ रंगमंदिरात शनिवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देण्याचे आवाहन मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. आ. संजय शिरसाठ म्हणाले, गणेश मंडळांना क्रांती चौकातून मिरवणुकीत येऊ द्या. छावणीच्या दुसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीला दोन तासांचा वेळ वाढवून द्या.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, गणेशोत्सवात राजकारण बाजूला ठेवून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा. आ. प्रदीप जैस्वाल म्हणाले, सध्या दीड वाजेपर्यंत मोबाइल शॉपी का सुरू राहतात, त्याकडे लक्ष द्या. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष विजय औताडे, माजी आ. किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, दीपक गिऱ्हे, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, अपर्णा थेटे, निखिल कुलकर्णी, सागर शेलार आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
‘बटण’च्या नशेकडे वेधले लक्ष
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी शहरात बटणच्या गोळ्या विक्रीकडे लक्ष वेधले. शिवाजीनगर मिरवणूक मार्गावर कुणालाही स्वागत स्टेजला परवानगी देऊ नका, असे सांगितले. नवीन औरंगाबाद शहर गणेश महासंघाचे संस्थापक बबन डिडोरे यांनी यास हरकत घेताना १८ वर्षांपासून तिथे स्टेज लावले जात असल्याची आठवण करून दिली.
पाच मंत्री, एक विरोधी पक्षनेता
खा. इम्तियाज जलील म्हणाले, ५ मंत्री, विरोधी पक्षनेता जिल्ह्यात असल्याने पुढच्या वर्षी खड्ड्यांचा विषयच येणार नाही. रात्री १२ नव्हे तर दोन वाजेपर्यंत गणेशोत्सवाला परवानगी मिळावी. तसा निर्णय आपले मंत्री घेऊन येतील. खैरे माझ्याकडे बघून प्रेमाने हसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधल्यावर सभागृहात हशा पिकला. ‘वक्रतुंड महाकाय’ हा श्लोक म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मंत्री बनल्यावर बोलता येत नाही
सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले, मी मंत्री झालो त्यात खूश असून, इम्तियाज यांनी लोकसभेत विषय मांडावेत. यावर खा. इम्तियाज यांनी ‘मला मंत्री करा’ अशी गुगली टाकली. मग सावे म्हणाले, मंत्री बनल्यावर बोलता येत नाही. पोलीस आयुक्तांना लिब्रल माईंड ठेवण्याचा सल्ला देतांना एवढे बारकाईने नका बघू, आम्ही काही चुकीचे करणार नसल्याचेही मंत्री सावे म्हणाले.
बटण हा पोलिसांचा नव्हे एफडीएचा विषय
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड म्हणाले, इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पुढचे खासदार आमचे होतील. बटणचा विषय पोलिसांचा नव्हे तर औषध प्रशासनाचा आहे. . लवकरच त्यासंबंधी बैठक घेवू. राष्ट्रीयकृत बॅंकेचे खाते व विमा काढून देण्यासाठी शिबीर घेण्याचे आवाहन करत गणेश मंडळ अध्यक्षांचा २ लाखांचा विमा काढण्याची घोषणाही त्यांनी करत गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. असे आवाहनही त्यांनी केले.
मानापमान नाट्याने तापली बैठक
बैठक सुरू होण्यापूर्वी झालेल्या सूत्रसंचालनात आ. संजय शिरसाठ यांच्या आधी चंद्रकांत खैरे यांचे सत्कारासाठी नाव उच्चारल्यावर शिरसाठ यांनी हरकत घेत हा राजशिष्टाचार नसल्याची आठवण पोलिसांना करून दिली. यावेळी बैठकीतून निघून जाण्याचा पवित्रा घेतला. मंत्री सावे, डाॅ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. प्रदीप जैस्वाल यांनी त्यांना शांत केले. संचालनात चुका वाढत गेल्याने पोलीस आयुक्तही तापले होते.