वाळूज महानगरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:21 PM2019-05-18T23:21:20+5:302019-05-18T23:21:27+5:30
बौद्ध समाज बांधव व आंबेडकरी अनुयायातर्फे वाळूज महानगरात शनिवारी (दि.१८) मोठ्या उत्साहात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. बजाजनगर येथे सद्भावना रॅली व वाळूज येथे काढलेल्या मिरवणूकीने उपस्थितांचे लक्ष वेधले.
वाळूज महानगर: बौद्ध समाज बांधव व आंबेडकरी अनुयायातर्फे वाळूज महानगरात शनिवारी (दि.१८) मोठ्या उत्साहात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. बजाजनगर येथे सद्भावना रॅली व वाळूज येथे काढलेल्या मिरवणूकीने उपस्थितांचे लक्ष वेधले.
पद्मपाणी बुद्ध विहार, आम्रपाली बुद्ध विहार, आनंद बुद्ध विहार, बोधीसत्व ध्यानसाधना केंद्र, पंचशील बुद्ध विहार, लुंबिनी बुद्ध विहार, समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने सामुहिक सद्भावना पायी रॅली काढण्यात आली. बजाजनरातील मोरे चौक येथून सजवलेल्या रथात भगवान गौतम बुद्धाची मुर्ती ठेवून निघालेल्या रॅलीचा मोहटादेवी मंदिर, भिम संदेश चौक मार्गे क्रांतीनगर वडगाव कोल्हाटी येथे सांगता झाली.
पु. भिक्खू संघाच्या हस्ते शेषेराव जोगदंडे याच्या निवास्थानी बुद्ध मुर्तीची स्थापना करुन सर्वांना खिर व भोजनदान देण्यात आले. हातात पंचरंगी व निळे ध्वज घेवून बुद्ध चरणं गच्छामीचा जयघोष करित शिस्तबद्ध निघालेली रॅली सर्वांची लक्ष वेधून घेत होती. यावेळी चौका-चौकात रॅलीच स्वागत करुन रॅलीतील धम्म बांधवांना पाणी व पेढे वाटप करण्यात आले. यासाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. वाळूज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठाण, संघमित्रा बुद्ध विहार, गौतम बुद्ध विहार यांच्यातर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. येथील साठेनगर येथून मिरवणूकीला सुरुवात झाली.
सजवलेल्या वाहनात गौतम बुद्धांची प्रतिमा ठेवून बाजारतळ मार्गे गावातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आलेल्या मिरवणूकीची साठेनगर येथील बुद्ध विहार येथे सांगता झाली. यावेळी बुद्ध अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. यावेळी मिरवणूक पहाण्यासाठी इतर समाज बांधवांनीही रस्त्यावर गर्दी केली होती.