उत्कंठेनंतर विजयाचा जल्लोष साजरा

By Admin | Published: May 17, 2014 12:36 AM2014-05-17T00:36:51+5:302014-05-17T00:58:13+5:30

चंद्रमुनी बलखंडे/ गजानन वाखरकर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी इमारतीसमोर शुक्रवारी सकाळपासूनच शिवसेना व काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

Celebration followed with enthusiasm | उत्कंठेनंतर विजयाचा जल्लोष साजरा

उत्कंठेनंतर विजयाचा जल्लोष साजरा

googlenewsNext

चंद्रमुनी बलखंडे/ गजानन वाखरकर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी इमारतीसमोर शुक्रवारी सकाळपासूनच शिवसेना व काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. शेवटच्या राऊंडपर्यंत मतमोजणीत शिवसेनेने आघाडी घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनामध्ये विजयाची उत्कंठाही शेवटपर्यंत कायम होती. हे चित्र ‘लोकमत’ चमूने शेवटपर्यंत कॅम्पसमध्ये राहून टिपले. अखेरच्या टप्प्यात प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव बदलल्याचे प्रामुख्याने पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी हिंगोलीजवळील लिंबाळा येथील शासकीय पॉलेटिक्नीक कॅम्पसमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. यावेळी मतमोजणीसाठी आलेले अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या प्रतिनिधींनाच आतमध्ये सोडल्या जात होते. कार्यकर्त्यांचा गाड्यांची पार्कींग करण्यासाठी शिवसेना व जिल्हा काँग्रेसच्या वतीने औंढा-हिंगोली रस्त्यालगत लिंबाळा येथे व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना बसण्यासाठी शामियाना टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे मतमोजणी कॅम्पससमोर शासनाच्या वतीने कार्यकर्त्यांना थांबण्याची सोय केली होती; परंतु पेंडॉल मात्र टाकण्यात आले नव्हते. बहुतांश कार्यकर्ते आपापल्या पक्षांच्या पदाधिकार्‍यांसोबत मिळेल त्या सावलीच्या ठिकाणी झाडाखाली आकडेमोड करण्यासाठी बस्तान मांडलेले दिसले. एवढेच नव्हे, तर काहींनी नाल्यालगतचा बेशरमाच्या झाडाच्या सावलीचा आश्रय घेतला होता. तर काहीजण उन्हातच बसले होते; परंतु दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा फारसा त्रास झाला नाही. या ठिकाणी सकाळी ८ वाजता जेमतेमच कार्यकर्ते हजर होते; परंतु सकाळी ११ वाजेनंतर शिवसेनेने आघाडी घेतल्याचे आकडे जाहीर होताच कार्यकर्त्यांचा ओघ वाढत गेला. दिवसभर या ठिकाणी २५०० ते ३००० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मतमोजणीत महायुतीचे उमदेवार सुभाष वानखेडे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीचा निकाल लाऊडस्पिकरवरून घोषित होताच महायुतीचे कार्यकर्ते जल्लोष करीत होते; परंतु काँग्रेस आघाडीला मतांमध्ये आघाडी मिळत नसल्याने कार्यकर्त्यांचे चेहरे हिरमुसले होते. तरी देखील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये विजयाची उत्कंठा शेवटपर्यंत दिसून येत होती. अखेरच्या टप्प्यातील मतमोजणी फेरीचा निकाल जाहीर होण्यास विलंब होत होता. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. निकालाबाबत शेवटी संभ्रम लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या फेर्‍या सुरू असतानाच १९ व्या फेरीला शिवसेनेचे सुभाष वानखेडे हे विजयी झाल्याची बातमी आतमधून बाहेर आली. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. त्याच वेळी लागलीच काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. राजीव सातव यांनी कॅम्पसमध्ये प्रवेश करून मतमोजणी हॉलमध्ये प्रवेश केला. त्याच्या १५ मिनिटांनी अ‍ॅड. सातव विजयी झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगून जल्लोष करण्यास सुरूवात केली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने ते माघारी फिरू लागले तोच पुन्हा खा. वानखेडे हे विजयी झाल्याची माहिती आली. या प्रकारामुळे काँग्रेस आघाडीचे कार्यकर्तेही चांगलेच गोंधळात पडले; परंतु १९ व्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांनी मतांची आघाडी घेत विजय मिळविल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसून आला. (प्रतिनिधी) हिंगोली : लोकसभा निवडणुकीची लढत ज्या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये झाली. त्यांच्या समर्थकांमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर शेवटपर्यंत गर्दी केलेली होती. विजयाबाबत कधी चिंता तर कधी उत्कंठा दिसून आल्यानंतर विजयाच्या जल्लोषात विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी आतषबाजीने मतमोजणी केंद्र दणाणून गेले. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच उमेदवारांच्या समर्थकांची मतमोजणी केंद्राबाहेर लगबग सुरू होती. लोकसभेच्या जागेसाठी एकुण २३ उमेदवार असले तरी खरी लढत असलेल्या आ. राजीव सातव व खा. सुभाष वानखेडे यांच्या समर्थकांचीच गर्दी जास्त होती. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीसाठी केंद्राबाहेर समर्थकात उत्सुकता होती. प्रमुख दोन्ही उमेदवारांची लढत पहिल्या फेरीपासूनच अतिशय अटीतटीची झाल्याने दोन्ही समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण होते. मताधिक्याचे अंतर अतिशय कमी असल्याने २२ व्या फेरीपर्यंत उत्कंठा व चिंताच दिसत होती. नंतरच्या दोन्ही लढती अतिशय अटीतटीच्या ठरल्याने विजय झाला की पराभव झाला याची खात्री पटल्याशिवाय कोणताच समर्थक शब्द काढत नव्हता. त्यामुळे विजयही सबुरीनेच साजरा केला गेला. अधिकृत घोषणा व मतदारसंघनिहाय माहिती समजत नसल्याने कोणत्याही समर्थकांना विश्वास बसत नव्हता. भरउन्हात बसूनही मतांची आकडेवारी घेत असताना भ्रमणध्वनीवरुन इतर मतदारसंघ प्रमुख लढती नेते यांच्या जय-पराजयाचा अंदाज घेत या जागेचे वेगळेपण समजावून सांगत होते. त्यामुळे पराभव झाला तरी जिव्हारी लागून घ्यायचा नाही आणि जय झाला तरी सबुरीनेच जल्लोष करायचा या स्थितीत दोन्ही समर्थक आल्याने शेवटच्या दोन्ही फेर्‍यांची आकडेवारी आल्यानंतरच विजयाची खात्री पटल्यानंतरच विजय साजरा केला. तर अनेकांनी काढता पाय घेतला. दुसरीकडे सुरूवातीच्या दोन फेर्‍या पोलिस खात्याच्या नियोजनामुळे अनेकांना ऐकता आल्या नसल्याने नाराजी व्यक्त केली. पासेसवाल्यांनाच मुख्य गेटमधून आतमध्ये सोडण्यात आल्याने मतदान केंद्राच्या समोरच्या मोकळ्या जागेत जाता आले नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विकतचे पाणी प्यावे लागत होते. तर बसण्यासाठी सावलीच नसल्याचेही मोजक्याच दोन-चार आंब्याच्या झाडांचा आसरा घ्यावा लागला. एकंदरच दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या प्रमुख नेते. कार्यकर्त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरत असल्याने समर्थकांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शेवटच्या फेरीची वाट बघावी लागली.

Web Title: Celebration followed with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.